CoronaVirus News: कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी रशियाशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:42 AM2020-08-15T02:42:25+5:302020-08-15T02:43:08+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती
जिनेव्हा : कोविड-१९ लसीची अतिरिक्त माहिती मिळविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (हू) रशियाशी चर्चा करीत आहे. संयुक्त राष्ट्रांतर्गत काम करणाऱ्या या संघटनेच्या वतीने अधिकृतरीत्या ही माहिती देण्यात आली आहे.
रशियाने कोरोना महामारीच्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस शोधून काढल्याचा दावा केला आहे. तसेच तिचे लवकरच उत्पादनही सुरू केले जाणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वत: यासंबंधीची घोषणा केली आहे.
रशियाच्या या लसीबाबत अनेक देशांनी संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर ‘हू’चे महासंचालक डॉ. ब्रुस आयलवर्ड यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, रशियाच्या लसीवर निर्णय घेण्यासाठी ‘हू’कडे पुरेशी माहितीच नाही. त्यामुळे लसीबाबत लगेच कोणताच निर्णय आम्ही जाहीर करू शकत नाही. त्यामुळे लसीची अतिरिक्त माहिती मिळविण्यासाठी आम्ही रशियाशी बोलत आहोत.
डॉ. आयलवर्ड यांनी सांगितले की, ‘हू’च्या समन्वयाने काही विकासक लस विकसित करीत असून अशा नऊ उमेदवारांच्या लसींच्या दुसºया, तिसºया टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. तथापि, यात रशियाच्या लसीचा समावेश नाही.
२ आठवड्यांत उत्पादन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ११ आॅगस्ट रोजी कोरोना लस विकसित केल्याची घोषणा केली. ही कारोना विषाणू विरोधातील जगातील पहिली नोंदणीकृत लस ठरली आहे. ही लस सुरक्षित असून आपण आपल्या मुलीला ती दिली असल्याचे पुतीन यांनी जाहीर केले.
त्यानंतर १२ आॅगस्ट रोजी रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुरास्को यांनी सांगितले की, या लसीचे उत्पादन रशियाकडून दोन आठवड्यांत सुरू करण्यात येणार आहे. लसीच्या प्रभावीपणाबद्दल उपस्थित करण्यात येत असलेला संशय निराधार असल्याचेही मुरास्को यांनी म्हटले.