CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 07:45 AM2020-04-15T07:45:28+5:302020-04-15T07:46:03+5:30
फेब्रुवारीमध्ये कंपनीची वार्षिक आढावा बैठक झाली होती. तेव्हा या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना प्रकृती अस्वास्थ्य किंवा कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. यामुळे ते आपापल्या घरी गेले होते.
न्यूयॉर्क : अमेरिकेमध्ये दिवसाला १५०० हून अधिक मृत्यू होत आहेत. तरीही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लॉकडाऊन उठविण्याच्या विचारात आहेत. अशावेळी अमेरिकेमध्ये डब्यात गेलेल्या एका कंपनीला मोठा फायदा झाला आहे. अनेक वर्षांच्या अपयशानंतर बायोजन या औषध कंपनीच्या अल्झायमरवरील औषधाने चांगले परिणाम दाखविले आहेत. यामुळे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माइकल वोनाटसोस खूपच उत्साहित दिसत आहेत. यामुळे कुठेतरी संशयाची पाल चुकचुकत आहे.
वोनाटसोस यांच्या चेहऱ्यावर मार्च महिन्यापासूनच तेज पहायला मिळत आहे. त्यांना फेब्रुवारीमध्ये बोस्टनच्या पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. चीनमधील कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या कंपनीचे प्लॅन आणि पुरवठा बाधित होणार नाही का? यावर वोनाटसोस यांनी नकारात्मक उत्तर देत आता पर्यंत सारे ठीक सुरु असल्याचे म्हटले होते. मात्र, जेव्हा ते हे सांगत होते, तेव्हाच बायोजनचे काही वरिष्ठ अधिकारी युरोपहून अमेरिकेमध्ये परतले होते. त्यांच्यामुळे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली होती.
फेब्रुवारीमध्ये कंपनीची वार्षिक आढावा बैठक झाली होती. तेव्हा या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना प्रकृती अस्वास्थ्य किंवा कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. यामुळे ते आपापल्या घरी गेले होते. मात्र, हे अधिकारी अमेरिकेतल्या सहा राज्यांतील असल्याने त्यांच्यामुळे त्यांच्या घरच्यांनाही कोरोनाची लागण झाली. हा व्हायरस एवढा झपाट्याने पसरला की अमेरिकेमध्ये काही दिवसांतच १० हजार रुग्णांचा आकडा पार झाला. यामुळे अमेरिकेमध्ये बायोजनला कोरोना पसरविण्यासाठी सर्वांत मोठा दोषी मानण्यात येत आहे. हे सारे अशा वर्गातील लोकांनी केले, ज्यांना उच्चशिक्षित आणि समजूतदार समजले जाते.
मॅसॅच्यूसेट्समध्ये बायोजेनच्या ९९ कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे संक्रमन झाले होते. त्यांच्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांचा आकडा अद्याप मोजण्यात आलेला नाही. मात्र, ही संख्या हजारात जाण्याची शक्यता आहे. इंडियानामध्ये दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले होते. टेनेसी एक आणि उत्तरी कॅरोलिनामध्ये सुरुवातीला सापडलेले ६ जण याच कंपनीचे होते.
कंपनीने नावे लपविली
बायोजनच्या काही उपाध्यक्षांनी या बैठकीला युरोपमध्ये हजेरी लावली होती. ते अमेरिकेमध्ये परतले तेव्हा अन्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. कंपनीने त्यांची नावे खासगी आयुष्याचे कारण देत सरकारला दिली नाहीत. त्यांची तपासणी केली की नाही याचीही माहिती दिलेली नाही. तसेच बोस्टनच्या बैठकीवेळी कोरोना पसरण्याची माहिती नसल्याचेही कारण कंपनीने दिले आहे. याच काळात अनेक कंपन्यांच्या बैठका रद्द झाल्या होत्या. अमेरिकेमध्ये कोरोना पसरल्यापासून कंपनीने 14004 हजार डॉलरचा महसूल कमावला आहे.