Coronavirus: कोरोना संक्रमणाचा हैराण करणारा प्रकार समोर; वैज्ञानिकही चक्रावले, अवघ्या २० दिवसांत...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:52 AM2022-04-22T10:52:23+5:302022-04-22T10:52:36+5:30
जेव्हा पहिल्यांदा कोरोना चाचणी केली त्यानंतर महिलेची तब्येत पुन्हा खराब होऊ लागली म्हणून पुन्हा चाचणी करण्यात आली. तीदेखील पॉझिटिव्ह आली.
गेल्या २ वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. या काळात कोट्यवधी लोकं कोरोनाग्रस्त झाले. लाखो लोकांचा जीव गेला. कोरोनाच्या विविध व्हेरिएंटमुळे सगळेच चिंतेत आहेत. अशातच कोरोना संक्रमणाबाबत एक हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. स्पेनच्या एका नर्सला केवळ २० दिवसांतच दोनदा कोरोना झाला आहे. संक्रमित होण्याचा इतका कमी कालावधी पहिल्यांदा समोर आला आहे.
३१ वर्षीय महिला मॅड्रिडमध्ये राहते. स्पॅनिश वैज्ञानिकांनी म्हटलंय की, अवघ्या २० दिवसांत ही महिला दोनदा कोरोना संक्रमित झाली. ती कोरोनाच्या २ वेगवेगळ्या व्हेरिएंटमुळे संक्रमित झाली. डिसेंबरच्या अखेरीस तिला डेल्टा व्हेरिएंटमुळे(Delta Variant) कोरोना झाला तर जानेवारीत ओमायक्रॉनमुळे(Omicron) ती पुन्हा एकदा संक्रमित झाली.
महिलेने घेतला होता बूस्टर डोस
वैज्ञानिकांनी सांगितले की, या महिलेने कोरोना लसीसोबत बूस्टर डोसही घेतला होता. काळजी घेऊनही महिलेची २० डिसेंबरला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र महिलेमध्ये कुठलेही कोरोना लक्षण दिसून आले नाही. कामावर परतण्यापूर्वी तिने १० दिवस स्वत:ला आयसोलेट केले होते. जेव्हा पहिल्यांदा कोरोना चाचणी केली त्यानंतर महिलेची तब्येत पुन्हा खराब होऊ लागली म्हणून पुन्हा चाचणी करण्यात आली. तीदेखील पॉझिटिव्ह आली.
डॉक्टरांनी लोकांना केले आवाहन
डॉ जेम्मा रेसियो यांनी सांगितले की, ज्या लोकांना कोरोनाचं संक्रमण झाले आहे. ते पुन्हा कोरोना संक्रमित होणार नाही असा विचार करू नका. भलेही कोरोना लसीचे सर्व डोस घेतले असले तरी त्यांना कोरोना होऊ शकतो हे समोर आले आहे. लंडनच्या इंपीरियल कॉलेजच्या स्टडीनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून संक्रमित व्यक्तींना पुन्हा संक्रमण होणे हे डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ५.४ पटीने जास्त आहे.
चौथ्या लाटेची शक्यता
जगभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले असताना भारतातही पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ऑगस्टपर्यंत कोरोनाची चौथी लाट येऊ शकते अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनाची चौथी लाट ही मुलांसाठी घातक ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान लहान मुलांना मोठा प्रमाणात संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत मुलांना कोरोनापासून दूर ठेवणं, संक्रमणापासून वाचवणं हे एक आव्हान आहे. ओमायक्रॉन XE (Omicron XE) आणि बीए 2 (BA2 variant) या दोन व्हेरिएंटने कहर केला असून हे व्हेरिएंट आतापर्यंतचे सर्वांत जास्त वेगाने प्रसार होणारे व्हेरिएंट आहेत.