coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेने केलं मोदीचं कौतुक, या तीन निर्णयांचा केला विशेष उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 04:08 PM2020-04-02T16:08:08+5:302020-04-02T16:09:28+5:30
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात देशासाठी 1 लाख 70 हजार कोटींच्या पँकेजची घोषणा केली होती.
नवी दिल्ली - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव भारतातही वेगाने होत आहे. दरम्यान, कोरोनाला अटकाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी भारतात करण्यात येत असलेल्या प्रयत्नांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच लॉकडाऊनदरम्यान गरीबांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे आपण प्रभावीत झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेबरेयस यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरोझ अधनोम घेबरेयेसस म्हणाले की, "लॉकडाऊनसारख्या निर्णयांचा गंभीर परिणाम गरीबांवर होत असतो. सर्वच देश आपापल्या नागरिकांना असतील तिथे राहण्याचे आवाहन करत आहेत. तसेच कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लोकांची वर्दळ थांबवत आहेत.मात्र अशा प्रयत्नांमुळे गरीबांना फार मोठा फटका बसू शकतो."
मात्र भारत सरकारने लॉकडाऊन करताना गरीबांना धान्य, रोख रक्कम आणि गँस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कौतुकास्पद आहे. कोरोना संकटादरम्यान 24 अब्ज डॉलरचे पँकेज जाहीर केल्याबद्दल मी मोदीचे अभिनंदन करतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले.
विकसनशील देश या पातळीवर लोकहिताच्या योजना जाहीर करण्याच्याबाबतीत अडखळतात. मात्र अशा प्रयत्नांमुळे पुढे जाऊन देशाला सामाजिक आणि आर्थिक बाबतीत भक्कम करण्यास मदत मिळते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात देशासाठी 1 लाख 70 हजार कोटींच्या पँकेजची घोषणा केली होती.