Coronavirus:‘कोरोना’बाहेरचं जग! ‘असे’ देश जिथं अजून कोरोना पोहोचला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:27 AM2020-05-04T01:27:49+5:302020-05-04T01:28:02+5:30
असे एकूण ३० देश आणि भूभाग आहेत, त्यांनी कोरोना संसर्गाचा रुग्ण सापडल्याचे मान्य केलेले नाही म्हणजे त्यांच्या देशात कोरोना पोहोचलेलाच नसेल असं नाही.
युरोप, आशिया, दक्षिण अमेरिका आपण म्हणतो जगभरात कोरोना पोहोचला. त्यानं जात-धर्म-देश-पंथ-लिंग सगळ्या सीमा भेदल्या आणि माणूसपणाच्या पातळीवर आणून उभं केलं जगभरातल्या माणसांना!
हे खरंच आहे. जगभरातील विविध देशांमध्ये मिळून ३४ लाख ६० हजार लोकांना (२ मे २०२० पर्यंतची आकडेवारी) कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. एकूण २१७ देशांनी आपल्या देशात कोरोना पोहोचल्याचं मान्य करत आकडेवारी जगजाहीर केली आहे.
मात्र, जगभरात आजही ३० देश आहेत, जिथं कोरोना विषाणू पोहोचलेला नाही किंवा त्या देशांनी हे जाहीर केलेलं नाही की आमच्याकडे कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.
असे एकूण ३० देश आणि भूभाग आहेत, त्यांनी कोरोना संसर्गाचा रुग्ण सापडल्याचे मान्य केलेले नाही म्हणजे त्यांच्या देशात कोरोना पोहोचलेलाच नसेल असं नाही. उदा. उत्तर कोरिया. या देशानं अजून मान्य केलेलं नाही की, आपल्या देशात कोरोना संसर्गाचे रुग्ण आहेत.
पण म्हणजे त्यांच्याकडे हे रुग्ण नसतीलच असं नाही असा जगभरातल्या अनेक देशांना संशय आहे. चीन, रशिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमा ज्या उत्तर कोरियाला लागून आहेत तिथं कोरोना विषाणू पोहोचलाच नाही, हे सरकारचं म्हणणं जरा संशयास्पद आहे. मात्र, असे संशय बाजूला ठेवले तरी उत्तर कोरियासह जगभरात असे ३० देश आणि भूभाग आहेत जिथं कोरोनाचा संसर्ग झालेला नाही.
जिथं कोरोना पोहोचला नाही, ते देश तसे दुरस्थ आहेत. छोटे भूभाग आहेत. काहीतर प्रशांत महासागरातली बेटं आहेत. जागतिक आरोग्य संस्था, संयुक्त राष्ट्र संघ आणि रॉयटर्स वृत्तसेवा यांनी एकत्रित ही माहिती जमवली आहे.
ते देश असे..
युरोप : स्वलबर्ड आणि जान माये इजलँड.
आशिया : नॉर्थ कोरिया आणि तुर्कमेनिस्तान.
दक्षिण अमेरिका : बाऊवेट इजलँड, साऊथ जॉर्जिया, साऊथ सँडविच इजलँड.
आफ्रिका : ब्रिटिश इंडियन ओशन टेरटरी, फ्रेंच साऊथर्न टेरेटरी, लेसोथो, सेंट हेलेना.
ओशेनिया : आफ्रिकन सोमोआ, ख्रिश्चन इजलँड, कोको (किंलिंग) इजलँड, कूक इजलँड, हर्ड इजलँड , मॅकडोनाल्ड इजलँड, किरीबाती, मार्शल इजलँड, मायक्रोनेशिया, न्यूरू, निअू, नॉरफोक इजलँड, पलाओ, पिटकेर्न, समोआ, सोलोमन इजलँड, टोकेवू, टोंगा, टुवालो, युनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेइंग इजलँड, वनावतू, वॅलिस अँड फ्युच्युरा इजलँड.