CoronaVirus News: संपूर्ण जगानं पाकिस्तानकडून शिकावं; कोरोना रोखल्याबद्दल WHOकडून तोंडभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 04:30 PM2020-09-12T16:30:14+5:302020-09-12T16:33:13+5:30
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पाकिस्तानला यश; जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रशंसा
इस्लामाबाद: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्ताननं केलेल्या प्रयत्नांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) संचालक टेड्रोस अधनोम यांनी पाकिस्ताननं उचललेल्या पावलांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. सध्या संपूर्ण जगानं पाकिस्तानकडून शिकण्याची गरज असल्याचं टेड्रोस म्हणाले. पाकिस्ताननं कोरोना विरुद्धच्या लढाईत वापरलेल्या रणनीतीचं टेड्रोस यांनी कौतुक केलं. पाकिस्ताननं कोरोनाशी लढण्यासाठी अनेक वर्षे जुन्या असलेल्या पोलिओ पॅटर्नचा वापर केला.
लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा
घरोघरी जाऊन लहान मुलांना पोलिओची लस देणाऱ्या पाकिस्तानमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचं टेड्रोस यांनी कौतुक केलं. पाकिस्ताननं याच आरोग्य साखळीचा वापर कोरोनाशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी केला. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लवकर नियंत्रणात आली. पाकिस्तानात सध्याच्या घडीला कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख इतकी आहे.
IMAचं ठरलं! आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर 'एवढ्या' रुपयांत होणार उपचार
जगातील अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात लवकर यश मिळालं. यापैकी बहुतांश देशांनी याआधी SARS, MERS, पोलिओ, इबोला, फ्लू यांच्यासारख्या साथीच्या आजारांचा सामना केला होता. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी केलेल्या कौतुकावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे माजी विशेष सहाय्यक डॉ. जफर मिर्झा यांनी भाष्य केलं. पाकिस्ताननं कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाल्याचं मिर्झा म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल पाकिस्तानसह आणखी काही देशांचंही कौतुक केलं. थायलंड, कंबोडिया, जपान, न्यूझीलंड, रिपब्लिक ऑफ कोरिया, सेनेगल, इटली, स्पेन आणि व्हिएतनाम या देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची त्यांनी प्रशंसा केली. पाकिस्तानात आतापर्यंत ३ लाख ९५५ जणांचा कोरोनाची लागण झाली. यापैकी ६ हजार ३७३ जणांचा मृत्यू झाला. २ लाख ८८ हजार ५३६ जणांनी कोरोनावर मात केली. तर सध्याच्या घडीला ६ हजार ४६ जणांवर उपचार सुरू आहे.