CoronaVirus: चिंतेत भर! जगात कोरोनाची तिसरी लाट प्रारंभीच्या टप्प्यात; WHO चा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:20 PM2021-07-15T12:20:11+5:302021-07-15T12:20:49+5:30
WHO Warn on Corona Third wave: गेल्या चार आठवड्यांत पाच देशांत कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढले आहेत. जगात १० आठवडे मृतांची संख्या देखील घटली होती. आता ती पुन्हा वाढू लागली आहे.
जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधनोम यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत (Corona Third wave) जगाला मोठा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरसची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात पोहोचली आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. जगभरात डेल्टा व्हेरिअंटने कहर सुरु केला असून भारतातही गेल्या तीन दिवसांपासून रुग्ण वाढू लागले आहेत. जगातही कोरोना रुग्ण वाढत असून डब्ल्यूएचओने जगभराची चिंता वाढविली आहे. डेल्टा व्हेरिअंट जगभरातील 111 देशांमध्ये पोहोचला आहे. (WHO reports 3 million Covid-19 cases globally, says Delta variant identified in 111 countries)
टेड्रोस यांनी सांगितले की, डेल्टा व्हेरिअंट (Corona Delta varient) हा सध्या नसला तरी लवकरच जगातील सर्वात खतरनाक व्हेरिअंट बनेल. कारण हा कोरोना व्हायरस सतत विकसित होत आहे आणि आपले रुप बदलत आहे. यामुळे वेगाने संक्रमण पसरविणारे व्हेरिअंट जगभरात बनू लागले आहेत. लसीकरण सुरु झाल्यामुळे काही काळापुरते कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसली होती, मात्र आता पुन्हा हे रुग्ण वाढू लागले आहेत.
कोरोनाचा आकडा 18.82 कोटींवर
गेल्या चार आठवड्यांत पाच देशांत कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढले आहेत. जगात १० आठवडे मृतांची संख्या देखील घटली होती. आता ती पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाचे जगभरातील रुग्ण 18.82 कोटी झाले आहेत. तर 40.5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 349 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
सीएसएसईनुसार अमेरिकेत जगातील सर्वाधिक रुग्ण सापडले असून मृतांचा आकडाही मोठा आहे. अमेरिकेत 33,946,217 रुग्ण सापडले आहेत. तर 608,104 मृत्यू झाले आहेत. दुसरा क्रमांक हा भारताचा लागतो. 30,946,074 रुग्ण सापडले आहेत. यानंतर ब्राझील (19,209,729), फ्रांस (5,884,395), रशिया (5,785,542), तुर्की (5,500,151), यूके (5,252,443), अर्जेंटीना (4,702,657), कोलंबिया (4,565,372), इटली (4,275,846) यांचा नंबर आहे.