coronavirus: वुहान झाले कोरोनामुक्त, शेवटच्या तीन रुग्णांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:20 PM2020-06-05T17:20:24+5:302020-06-05T17:42:51+5:30
वुहानमधील तब्बल एक कोटी लोकांची चाचणी केल्यानंतर आता शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही.
बीजिंग - जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र बनलेले चीनमधील वुहान शहर आता जवळपास कोरोनामुक्त झाल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या शेवटच्या तीन रुग्णांनीही कोरोनावर मात केली असून, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच वुहानमधील तब्बल एक कोटी लोकांची चाचणी केल्यानंतर आता शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही.
दरम्यान, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बाहेरून आलेल्या पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामधील चार जण हे शांघाईमधील आहेत. तर एक जण हा सिचुआन प्रांतामधील आहे. तसेच गुरुवारी लक्षणे दिसत नसलेले तीन रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या २९७ झाली आहे. या सर्व रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा एकूण आकडा ८३ हजार ०२७ एवढा झाला असून, त्यापैकी ६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ७८ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
सरकारी वृत्तपत्र असलेल्या पीपल्स डेलीने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी वुहानमधील शेवटचे तीन संक्रमित रुग्णही बरे झाले आहेत. तसेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार वुहानमध्ये अजूनही २४५ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. मात्र त्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या