Coronavirus: धक्कादायक! कोरोनाचा खुलासा करणारी महिला डॉक्टर अचानक बेपत्ता; चीन सरकारवर संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:27 AM2020-04-01T10:27:39+5:302020-04-01T10:33:00+5:30
डॉक्टर एईचा रिपोर्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
वुहान – चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसनं साडेआठ लाखांहून अधिक लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. तर ४२ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. कोरोना व्हायरसचं संकट जगातील १८० देशांवर पसरलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे.
जगावर संकट उभं करणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत सर्वात प्रथम अधिकाऱ्यांना अलर्ट देणाऱ्या चीनच्या वुहान शहरातील डॉक्टर एई फेन बेपत्ता झाल्या आहेत. या आजाराबाबत सार्वजनिक माहिती दिल्यामुळे त्यांच्यावर बंदी आणली आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेपत्ता होण्यापूर्वी एईने एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट सार्वजनिक केला होता. हा रिपोर्ट सार्वजनिक केल्यानंतर वुहान सेंट्रल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर एईला तुला याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.
डॉक्टर एईचा रिपोर्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. कोरोनाचा खुलासा करणारे डॉक्टर ली वेलिआंग यांच्याप्रमाणे एई चर्चेचा विषय बनली होती. डॉक्टर ली यांनाही चीनी अधिकाऱ्यांनी धमकी दिली होती. डॉक्टर एई यांनी चीनी पत्रिकाला मुलाखत दिली होती. ज्यात कोरोना व्हायरसबाबत सूचना देऊनही रुग्णालयाने दुर्लक्ष केल्याचा आरोप तिने केला होता. या मुलाखतीनंतर डॉक्टर एई बेपत्ता झाल्या आहेत.
डॉक्टर एई अशावेळी बेपत्ता झाल्याचं समोर येत आहे ज्यावेळी चीन सरकारवर कोरोना व्हायरसबाबत महत्त्वपूर्ण माहिती लपवल्याचा आरोप होत आहे. वुहान शहरात कोरोनामुळे किती मृत्यू झाले? याबाबत रहस्य आहे. वुहान शहरातील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शहरात कमीत कमी ४२ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे पण चीनी अधिकाऱ्यांच्या माहितीमध्ये प्रचंड तफावत असल्याचं दिसून येतं. चीनच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, वुहानमध्ये ३२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आता साडेआठ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४२ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी डॉक्टर एई यांचे अचानक बेपत्ता होणं चीन सरकारवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.