coronavirus : तुमची मुलं घरात कोरोना -कोरोना खेळतात ? - मग सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:15 PM2020-04-13T16:15:40+5:302020-04-13T16:18:33+5:30
तुमची मुलं घरात काय खेळतात? मुलांच्या मनात नेमकं काय चाललं आहे?
तुमची मुलं नेमका घरात कुठला खेळ खेळतात याकडे जरा लक्ष द्या!
आणि त्यावर रिअॅक्ट न होता, जरा शांतपणो त्या खेळाचा विचार करा!
-असं बालमानसशास्त्र आणि बालकांचे खेळ याविषयातले तज्ज्ञ असलेले लोक तिकडे दूर अमेरिकेत वारंवार सांगत आहेत.
त्याचं कारण अर्थातच कोरोना.
एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरने लिहिलेली निनावी (अर्थात त्यामुळे फॅक्ट चेक करता आलं नाही) पोस्ट अलिकडेच अमेरिकेत व्हायरल झाली होती की, 4 वर्षाची एक मुलगी. तिच्या लहान दोन वर्षाच्या मुलीला येताजाता खोटंखोटं थर्मामिटर लावून तपासत असे. खेळण्यातला स्टेथोस्कोप लावून तपासत असे. खोटं खोटं औषध देत असे. एरव्हीही लहान मुलं डॉक्टर डॉक्टर खेळतात. मोठय़ांना टुचूक करतात. त्यांचं बीपी तपासतात. कारण त्यांनी डॉक्टरकाकांकडे हे सारं पाहिलेलं असतं.
मात्र आता कोरोना लॉकडाऊन आणि त्यानं पसरलेलं भय, घरातल्या चर्चा, टीव्हीवरच्या बातम्या हे सतत पाहत आहेत. त्यामुळे ते ही कोरोना कोरोना खेळायला लागले आहेत. त्यातलीच ही एक मुलगी. ती सातआठ दिवस बहिणीला असं खोटं खोटं ( पण तिच्यामते तर खरंच) तपासत होती. आणि एक दिवस तिनं निदानही जाहीर केलं की बहिणीला कोरोना झाला आहे.
तिनं आईबाबांना सांगूनही टाकलं की, नो बडी कॅन सेव्ह हर! आपली बहीण आता मरणार हे त्या मुलीच्या पक्कं डोक्यात बसलं होतं. इतकं की आपली बहीण जीवंत आहे, आपण सगळे घरात सुरक्षित आहोत यावरचा विश्वासच त्या चार वर्षाच्या मुलीनं गमावला.
हे झालं एक टोकाचं उदाहरण. मात्र घरोघरची मुलं जगभरात घरबंद आहेत. बाहेर जाता येत नाही. मोकळ्या मैदानात खेळता येत नाही. त्यात त्यांचे मित्र भेटत नाहीत. शारीरिक ऊर्जाही त्यांची जिरत नाही.
अमेरिकेच्याच वेस्टर्न रिव्हर्स युनिव्हर्सिटीत शिकण्याशिकवण्यातली प्राध्यापक सॅण्ट्रा रस. ती म्हणते, ‘खेळ ही लहान मुलांची भाषा आहे. ते प्रत्येक गोष्टीचा, अनुभवाचा खेळ करुन पाहतात. तो अनुभव ते स्वत: जगण्याचा प्रयत्न करतात. एरव्हीही वादळ, भूकंप, मोर्चे, ब्लास्ट, चोरपोलीस, मिनिस्टर मिनिस्टर हे खेळ मुलं खेळतात कारण ते विषय त्यांच्या कानावर पडतात. अमेरिकेत हुरीकेन येतात तेव्हाही अनेक मुलं तो खेळ खेळतात. त्यांचं खेळणं हा त्यांचा अनुभव, त्यांच्या विचारांचा निचरा, त्यातली गंमत हे सारं असतं. ते तेवढढय़ापुरतं खेळतात, त्यातून बाहेर पडतात तोवर ठीक आहे. मात्र तोच तो खेळ ते सतत खेळू लागले, आणि तो खेळ हेच वास्तव असं समजू लागले तर मात्र पालकांनी काळजी घ्यायला हवी. मुळात तिथवर गोष्टी जाणारच नाही, यासाठी सजग रहायला हवं. ते सजग रहायचं म्हणजे आपण सतत मुलांशी खेळायचं असं नव्हे, त्यांचं त्यांना खेळू देताना, ते काय खेळतात, याकडेही लक्ष दद्यायला हवी. त्यांच्या खेळाची भाषा समजून घ्यायला हवी!’
-मात्र सध्या हेच पालक करत नाही, िकंवा त्यांना जमत नाही. घरबंदपणामुळे पालक स्वत: असुरक्षित आहेत. रोजीरोटीचे प्रश्न आहेत. त्यात एक भावनाही बळावते की, आता आपण घरीच आहेत, मुलांच्या सोबतच आहोत तर आपलं मुलांकडे लक्ष आहे. आपण त्यांना वेळ देतो आहे. वर्क फ्रॉम होम करणारे पालक तर सोडूनच दद्या पण ज्यांना सुटीच मिळाली आहे, ते पालकही मुलांशी खेळताना, किंवा क्वालिटी टाइम त्यांना देतांना दिसत नाहीत. ते शरीरानं घरात आहेत, मनानं मुलांसोबत नाहीत.’
मुलांच्या खेळाचा कोरोना पोरखेळ होऊ देणार नाही म्हणून पालकांनी डोळे उघडे ठेवायला हवे.