CoronaVirusVaccine: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना झटका, मॉडर्नानं लशीसंदर्भात केला मोठा खुलासा!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 1, 2020 01:26 PM2020-10-01T13:26:14+5:302020-10-01T13:32:31+5:30
Coronavirus Vaccine News Update : अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते, की अेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच 3 नोव्हेंबरपूर्वी कोरोना लस तयार होऊ शकते.
वॉशिंग्टन - संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. तर मृचांचा आकडाही सातत्याने वाढतांना दिसत आहे. जगातील अनेक देशांतील वैज्ञानिक कोरोनावरील लस तयार करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. यातच आता अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या कामाला लागलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे.
अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते, की अेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच 3 नोव्हेंबरपूर्वी कोरोना लस तयार होऊ शकते. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून जबरदस्त राजकारण आणि त्यांच्यावर टीकाही झाली आहे. यातच अमेरिकेत ही लस तयार करत असलेली कंपनी मॉडर्नाने (Moderna) स्वतःच स्पष्ट केले आहे, की अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी कोरोना लस येऊ शकणार नाही.
एका माध्यमाने बुधवारी मॉडर्ना कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा (सीईओ) हवाला देत सांगितले, की नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी मॉडर्नाची संभाव्य कोरोना लस अर्ज करण्यासाठी तयार नाही. स्टाफेन बंसेल (Stéphane Bancel)यांनी एका मोठ्या मीडिया कंपनीला सांगंगितले, की अमेरिकेतील सर्व स्थारांतील लोकांना पुढच्या पावसाळ्यापर्यंत लस वितरित करण्याची परवाणगी दिली जाऊ शकत नाही.
रॉयटर्स वृत्त संस्थेने मॉडर्नाला या वक्तव्यावर काही प्रश्न विचारले आहेत. मात्र, याचे उत्तर अद्याप आलेले नाही. माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हणण्यात आले आहे, की मॉडर्नाची लस, किमान 25 नोव्हेंबरच्या आधी फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनची इमरजन्सी यूज ऑथरायझेशन घेण्यासाठी तयार होणार नाही.
कोरोना लस, अमेरिकेच्या निवडणुकीतील एक महत्वाचा मुद्दा -
कोरोनाचा सामना करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित करण्याच्या शर्यतीत अमेरिकेची मॉडर्ना कंपनीदेखील आहे. सध्या या लशीची तिसरी ट्रायल सुरू आहे. कोरोना लस हा अमेरिकेच्या निवडणुकीत एक महत्वाचा मुद्दा बनला आहे.