चीनची दादागिरी रोखण्यासाठी हे दोन 'कट्टर शत्रू' आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 06:08 PM2018-03-05T18:08:29+5:302018-03-05T18:12:00+5:30
दक्षिण चीन सागरासंबंधी आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय मान्य करायला चीन तयार नसून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला हक्क सांगत आहे. या समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे चीनला या भागात जास्त रस आहे.
दानांग - दक्षिण चीन समुद्रातील चीनचा विस्तार आणि दादागिरी रोखण्यासाठी अमेरिका आणि व्हीएतनाम हे दोन देश जुनं शत्रूत्व विसरुन जवळ येत चालले आहेत. अमेरिकेची कार्ल व्हिन्सन ही विमानवाहू युद्धनौका सोमवारी व्हिएतनामच्या दानांग शहरातील बंदरात येणार आहे. व्हिएतनाम युद्धाच्या समाप्तीनंतर प्रथमच अमेरिकन युद्धजहाज व्हिएतनामला येत आहे.
अमेरिकेचे जवळपास 5 हजार नौसैनिक व्हिएतनामला येत आहे. या युद्धजहाजासोबत क्रुझर आणि डिस्ट्रॉयरही येणार आहे. 1975 साली व्हिएतनाम युद्धाची समाप्ती झाली. दक्षिण चीन सागरासंबंधी आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय मान्य करायला चीन तयार नसून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला हक्क सांगत आहे. या समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे चीनला या भागात जास्त रस आहे.
इथे चीनने अनेक कृत्रिम बेटे उभारली आहेत. त्यामुळे व्हिएतनामच्या राष्ट्रीय हिताला धोका निर्माण झाला आहे. चीन एकप्रकारे पश्चिम पॅसिफिक सागरातील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. त्यामुळे अमेरिकेने या भागातील सक्रियता वाढवली आहे. अमेरिकेच्या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट ही या दोन देशातील वैरत्वाची भावना संपुष्टात आल्याचे लक्षण आहे. चीनचा धोका ओळखून दोन्ही देशांनी संरक्षण संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे.