Water: पाण्याच्या एक एक थेंबाचा हिशोब, या देशात मोजून मापून मिळणार पाणी, अपव्यय केल्यास होणार तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:11 AM2023-04-01T00:11:00+5:302023-04-01T00:11:10+5:30
आफ्रिका खंडातील ट्युनिशिया या देशामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या संकटामुळे देशातील सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. ...
आफ्रिका खंडातील ट्युनिशिया या देशामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या संकटामुळे देशातील सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. देशात पाण्यासाठी कोटा सिस्टिम लागू करण्यात आली आहे. म्हणजेच प्रत्येकाला तोलून मापून पाणी मिळणार आहे. एवढंच नाही तर शेतीवाडीसाठीच्या पाण्याच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. हा कठोर नियम ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
ट्युनिशियामधील कृषी मंत्रालयाचे अधिकारी हमादी हबीब यांनी सांगितले की, ट्युनिशिया गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. त्याच्या धरणांमधील पाण्याची क्षमता ही १०० कोटी क्युबिक मीटर एवढी आहे. ती घटून आता ३० टक्क्यांवर आली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यापासून यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत ट्युनिशियामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे.
कृषीमंत्रालयाने ही परिस्थिती पाहून पुढच्या सहा महिन्यांपर्यंत पिण्याच्या पाण्याची रेशनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या काळात कुणीही आपली कार धुणार नाही. तसेच झाडांनाही पाणी देणार नाही. तसेच इतर साफसफाईसाठी पाण्याचा वापर केला जाईल. जर कुणी या नियमाचं उल्लंघन केलं. तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई आणि तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
ट्युनिशियातील जल कायद्यानुसार नियम तोडणाऱ्याला सहा दिवसांपासून सहा महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ट्युनिशियामधील नागरिकांनी सांगितले की, त्यांच्या देशातील सरकार गेल्या दोन आठवड्यांपासून रात्री पाण्याच्या पुरवठ्यामध्ये कपात करत आहे. राजधानी आणि इतर शहरांमध्ये पाण्याचे रेशनिंग सुरू झाले आहे. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाचं वातावरण आहे.