शौर्य हाच विकासाचा आधार
By admin | Published: July 6, 2017 02:02 AM2017-07-06T02:02:12+5:302017-07-06T02:02:12+5:30
भारत आणि इस्रायलचे संबंध परस्पर विश्वास, मैत्री आणि सांस्कृतिक वारशावर प्रस्थापित झाले आहेत. इस्रायलच्या शौर्याला मी प्रणाम करतो.
तेल अवीव : भारत आणि इस्रायलचे संबंध परस्पर विश्वास, मैत्री आणि सांस्कृतिक वारशावर प्रस्थापित झाले आहेत. इस्रायलच्या शौर्याला मी प्रणाम करतो. हेच शौर्य इस्रायलच्या विकासाचा पाया आहे. संख्या आणि आकार एवढा महत्त्वाचा नाही, हे इस्रायलने जगाला सिद्ध करून दाखविले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत व इस्रायलच्या अतूट संबंधांची अनेक उदाहरणे दिली.
इस्रालयच्या ऐतिहासिक भेटीवर असलेल्या मोदी यांनी बुधवारी तेल अवीव येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. हिब्रूतून सुरू केलेल्या भाषणात त्यांनी भारत व इस्रायलच्या अतूट संबंधांची अनेक उदाहरणे दिली. इस्रायली नागरिक अनेक क्षेत्रांत व्यापक काम करीत असल्यामुळे १२ जणांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. इस्रायलची उभारणी करण्यात भारतातून आलेल्या नागरिकांनी भरीव योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले.
हृदयात स्थान असलेल्यांना कागदपत्रांची गरज नसते. त्यामुळे ओसीआय (ओव्हरसिज सिटिजन आॅफ इंडिया) कार्ड मिळणार नाही, असे इस्रायली समूदायांच्या बाबत होणार नाही, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली. तसेच इस्रायलमध्ये लष्करी सेवा देणाऱ्यांच्या कुटुंबाला ओसीआय कार्ड मिळेल, अशी खात्रीही त्यांनी दिली.
इतक्या वर्षांच्या संबंधानंतरही इस्रायलमध्ये इंडियन कल्चरल सेंटर नाही. मात्र, लवकरच असे सेंटर सुरू करण्यात येईल. भारत तुमच्या हृदयात आहे. इंडियन कल्चरल सेंटर तुम्हाला सदैव भारतीय संस्कृतीशी जोडलेले ठेवेल. इस्रायलमधील भारतीयांना कायम भारतात यावे अशी इच्छा व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली-मुंबई-तेल अविव विमान सेवा सुरू करणार असल्याची घोषणाही यावेळी केली. इस्रायलमध्ये मराठी भाषेतून मायबोली हे नियतकालिक निघते, हे मोदींनी अभिमानाने सांगितले.
२०२२ हे भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे महत्त्वाचे वर्ष असल्यामुळे तोपर्यंत देशातील सर्व गरिबांना घरे देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. घरांबरोबरच वीज व पाणी आदी सुविधाही देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मोदी यांनी केली.