कोर्टाने बलात्का-याला दिली 'नो सेक्स'ची शिक्षा
By admin | Published: February 8, 2017 06:50 PM2017-02-08T18:50:17+5:302017-02-08T19:05:52+5:30
19 वर्षाचा हा तरूण 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
इडाहो, दि. 8 - अमेरिकेच्या इडाहो प्रांतात न्यायाधीशांनी बलात्काराच्या आरोपात दोषी आढळलेल्या एका तरुणाला वेगळीच शिक्षा सुनावली आहे. 19 वर्षांचा हा तरुण 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. आपल्या पत्नीशिवाय इतर कोणासोबतही तो सेक्स करू शकत नाही, अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. मात्र, तरुणाचं लग्न झालं नसल्याने सेक्स करण्यासाठी त्याला आधी लग्न करावं लागणार आहे.
कोडी स्कॉट असं या तरुणाचं नाव असून, ट्विन फॉल्स येथील तो रहिवासी आहे. न्यायाधीश रॅंडी स्टोकर यांनी कोडीला आधी 5 ते 15 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर ती शिक्षा बदलत 'रायडर प्रोग्रॅम' अंतर्गत एक वर्ष सेक्स न करण्याची शिक्षा दिली. तसेच जर तरुणाने ही शिक्षा पूर्ण केली तर त्याची सुटका करण्यात येईल, असं सांगितलं. जर त्याने या शिक्षेचं उल्लंघन केलं तर मात्र त्याला पुन्हा तुरुंगात पाठवलं जाईल, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
19 वर्षाच्या या तरुणाने आतापर्यंत 34 जणांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती न्यायालयासमोर आली होती. त्यामुळे न्यायालयाने त्याला एक वर्ष सेक्स न करण्याची शिक्षा सुनावली. 2016 साली 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता, त्याने आपल्यावरील आरोप मान्य केला आहे.
काय आहे रायडर प्रोग्रॅम-
इडाहो प्रांतात एखादा व्यक्ती गंभीर आरोपामध्ये दोषी आढळल्यास न्यायाधीशासमोर दोन प्रकारच्या शिक्षा सुनावण्याचा पर्याय असतो. पहिल्या पर्यायात दोषीला तुरुंगात पाठवलं जातं. तर दुस-या पर्यायात दोषीच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. या दरम्यान जर दोषीमध्ये सकारात्मक बदल आढळला तर त्याची शिक्षा माफ केली जाते. याशिवाय रायडर प्रोग्रॅमचा आणखी पर्याय असतो. हा पर्याय म्हणजे पहिल्या दोन्ही पर्यायांचं मिश्रण असतं. याद्वारे न्यायाधीश दोषीला तुरुंगवासाची शिक्षा तर सुनावतं मात्र, नंतर त्याला इडिहो डिपार्टमेंट ऑफ करेक्शन्सच्या निरीक्षणाखाली ठेवलं जातं. जर दोषीने ही शिक्षा पूर्ण केली तर त्याची शिक्षा माफ करण्याबाबत न्यायालय पुनर्विचार करू शकतं.