याला म्हणतात नशीब! फाशीची शिक्षा होण्याआधी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:13 PM2021-11-10T12:13:26+5:302021-11-10T12:13:46+5:30
फाशीची शिक्षा सुनावण्याआधी गुन्हेगाराला झाली कोरोनाची लागण
सिंगापूर: कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं सिंगापूरमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची फाशी टळली आहे. अमली पदार्थ प्रकरणी एका ३३ वर्षीय व्यक्तीला सिंगापूरातील सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवलं. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्याआधी त्याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे फाशीच्या शिक्षेला न्यायालयानं स्थगिती दिली.
नागेंद्रन के. धर्मालिंगमला अमली पदार्थ प्रकरणी बुधवारी फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. मात्र कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मंगळवारी न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिली. नागेंद्रननं शिक्षेविरोधात अपील केलं आहे. त्यावरील ऑनलाईन सुनावणी पूर्ण होईपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार नाही, असं न्यायालयानं सांगितलं.
नागेंद्रन के. धर्मालिंगमला फाशीच्या शिक्षेविरोधात शेवटचं अपील करण्यासाठी अपिलीय न्यायालयात आणण्यात आलं. त्याला ११ वर्षांपूर्वी ही शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला न्यायालयात आणण्यात आलं. तिथे एका न्यायाधीशानं नागेंद्रन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. त्यामुळे फाशी स्थगित करण्यात आली. सध्याची परिस्थिती पाहता, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणं योग्य ठरणार नाही, असं न्यायमूर्ती एँड्रू फांग, न्यायमूर्ती जूदिथ प्रकाश आणि न्यायमूर्ती कन्नन रमेश यांनी म्हटलं.