पाकिस्तान मोठ्या अडचणीत! 'त्या' लग्नांमुळे संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 09:56 AM2022-02-11T09:56:10+5:302022-02-11T09:58:18+5:30
पाकिस्तानातील संपूर्ण पिढी सापडतेय विळख्यात; परंपरा ठरतेय धोकादायक
इस्लामाबाद: भारताला कायम पाण्यात पाहणारा पाकिस्तान वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. नात्यांमध्ये होत असलेल्या विवाहांमुळे आनुवांशिक विकार होत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील बहुतांश भागांत नात्यांमध्येच विवाह केले जातात. पाकिस्तानमधील अनेक ख्यातनाम व्यक्ती, सेलिब्रिटींचे विवाहदेखील नात्यांमध्येच झाले आहेत. या विवाहांमुळे विविध प्रकारचे आनुवांशिक विकार होत असल्याची शास्त्रीय माहिती पुढे आली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये वास्तव्यास असलेल्या ५६ वर्षांचे गफूर हुसेन शाह पेशानं शिक्षक आहेत. त्यांना ८ मुलं आहेत. कबाइली रिवाजांनुसार ते त्यांच्या मुलांचे विवाह नात्यांमध्येच करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. मात्र अशा विवाहांमुळे काय होतं त्याचा प्रत्यय शाह यांना आला आहे. १९८७ मध्ये शाह यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. शाह यांच्या ३ मुलांना आनुवंशिक विकार आहेत. त्यांच्या एका मुलाच्या मेंदूचा पूर्णपणे विकास झालेला नाही. एका मुलीला व्यवस्थित बोलता येत नाही. तर दुसऱ्या मुलीला ऐकण्यात अडचणी येतात.
पाकिस्तानातील जेनेटिक म्युटेशनवर आधारित एक अहवाल २०१७ मध्ये प्रसिद्ध झाला. नात्यांमध्ये होत असलेल्या विवाहांमुळे आनुवंशिक विकार वाढत असल्याचं या अहवालातून समोर आलं. आनुवंशिक विकारांसाठी जबाबदार असलेल्या म्युटेशन्सना ट्रॅक करून हा अहवाल तयार करण्यात आला.
पाकिस्तानातील बहुतांश पालक त्यांच्या मुलांचे विवाह जवळच्या नातेवाईकांशी करून देतात. अशाच कुटुंबांमध्ये आनुवंशिक विकारांची संख्या जास्त असल्याचं डॉ. हुमा अशरद चिमा यांनी सांगितलं. देशातील ब्लड डिसऑर्डर थॅलेसेमिया बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आनुवंशिक आजारांची पडताळणी करणाऱ्या जेनेटिक टेस्टिंग आणि प्री नॅटल स्क्रीनिंगची संख्याही पाकिस्तानात कमी आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये यावरील उपचार उपलब्ध नाहीत.
नात्यांमध्ये विवाह कशासाठी?
नात्यांमध्ये विवाह करणं इस्लामी परंपरांशी संबंधित असल्याचं कराचीतील आरोग्यतज्ज्ञ शिराज उद दौलाह यांनी सांगितलं. 'मी याबद्दल मौलवींशी संवाद साधला. त्यांना आनुवंशिक विकारांच्या वाढत्या प्रमाणाची माहिती दिली. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं. चुलत किंवा मामे भाऊ/बहिणीशी विवाह केल्यानं आनुवंशिक आजारांची संख्या वाढत असल्याचं तुम्ही लोकांना सांगा, यासाठी मी त्यांना विनंती केली. मात्र मौलवींनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. असे विवाह इस्लामच्या शरिया कायदा आणि पैगंबर मोहम्मद यांच्या परंपरेनुसार होत असल्याचं त्यांनी सांगितलं,' अशा शब्दांत शिराज यांनी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यात आलेलं अपयश बोलून दाखवलं.