भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:53 AM2021-06-30T08:53:25+5:302021-06-30T08:54:01+5:30

भारतानं विकसीत केलेल्या 'कोव्हॅक्सीन' (Covaxin) लसीचं कौतुक आता थेट अमेरिकेनं केलं आहे.

Covaxin effectively neutralises Alpha Delta Covid 19 variants says US National Institute of Health | भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा

भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा

Next

भारतानं विकसीत केलेल्या 'कोव्हॅक्सीन' (Covaxin) लसीचं कौतुक आता थेट अमेरिकेनं केलं आहे. कोव्हॅक्सीन लस कोविड-१९ च्या अल्फा, डेल्टा या दोन्ही व्हेरिअंटवर प्रभावी असल्याचा निर्वाळा अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं (US National Institute of Health) दिला आहे. 'कोव्हॅक्सीन'च्या परिणामकारकतेवर संशय व्यक्त करणाऱ्या चर्चांना आतका यातून पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. (Covaxin 'effectively neutralises' Alpha, Delta Covid-19 variants, says US National Institute of Health)

"भारतातील भारत बायोटेक कंपनीनं विकसीत केलेली कोव्हॅक्सीन लस कोविड-१९ च्या अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिअंटला प्रभावीपणे नष्ट करत असल्याचं दिसून आलं आहे", असं अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं नमूद केलं आहे. कोव्हॅक्सीनचा डोस घेतलेल्या दोन नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिअंटविरोधात लढण्यासाठीच्या अँटीबॉडी आढळून आल्या आहेत, असं अमेरिकेच्या आरोग्य संस्थेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोव्हॅक्सीन कोरोनावर प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. 

भारत बायोटक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमानं 'कोव्हॅक्सीन' लस तयार करण्यात आली आहे. अल्फा म्हणजेच B.1.1.7 व्हेरिअंट सर्वातआधी ब्रिटनमध्ये आढळला होता. तर डेल्टा म्हणजेच B1.617 व्हेरिअंट सर्वातआधी भारतात आढळून आला असल्याचं सांगितलं जात आहे. 

"कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अंतरिम अहवालानुसार लस ७८ टक्के प्रभावी असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटवर लस ७० टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. लस पूर्णपणे सुरक्षीत आणि प्रभावी आहे", असंही अमेरिकेच्या आरोग्य संस्थेनं नमूद केलं आहे. लस निर्मात्या कंपनीनं नुकतंच लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल तज्ज्ञांच्या समितीकडे सोपवला असून यात लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. 

कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेत भारतानं मोठी आघाडी उघडली असून जगात सर्वाधिक लसीकरण करण्याचं काम देशानं केलं आहे. देशात ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेकानं सीरमसोबत केलेल्या करारातून तयार झालेल्या कोव्हिशील्ड आणि भारतानं विकसीत केलेल्या कोव्हॅक्सीन अशा दोन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. याशिवाय रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीला देखील आपत्कालीन वापराची मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय येत्या काळात अहमदाबादस्थित झायडस कॅडिलाच्या लसीला आणि अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीच्या लसीच्या वापरालाही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Covaxin effectively neutralises Alpha Delta Covid 19 variants says US National Institute of Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.