कोरोनाच्या उत्पत्तीचा आरोप असलेल्या वुहान प्रयोगशाळेलाच चीनकडून सर्वोत्तम कामाचा पुरस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:29 AM2021-06-22T11:29:30+5:302021-06-22T11:36:37+5:30

कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा आरोप असलेल्या चीनच्या वुहान प्रयोगशाळाला तेथील सरकारनं कोरोना काळात सर्वोत्तम काम केल्याबद्दल देशाच्या विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे.

Covid 19 Lab Leak Wuhan Institute Of Virology Is Nominated For China Top Science Award | कोरोनाच्या उत्पत्तीचा आरोप असलेल्या वुहान प्रयोगशाळेलाच चीनकडून सर्वोत्तम कामाचा पुरस्कार!

कोरोनाच्या उत्पत्तीचा आरोप असलेल्या वुहान प्रयोगशाळेलाच चीनकडून सर्वोत्तम कामाचा पुरस्कार!

Next

कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा आरोप असलेल्या चीनच्या वुहान प्रयोगशाळाला तेथील सरकारनं कोरोना काळात सर्वोत्तम काम केल्याबद्दल देशाच्या विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. कोरोना विषाणू लीक केल्याचे आरोप वुहान प्रयोगशाळेवर जगभरातून केले जात आहे. पण चीननं मात्र याच प्रयोगशाळेनं कोरोनाला आळा घालण्यासाठी केलेलं काम सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हणत चायना अकॅडमी ऑफ सायन्सकडून विज्ञान व तंत्रज्ञान निर्मितीसाठी वुहान प्रयोगशाळेला पुरस्कार दिला जात आहे. 

इतकचं नव्हे, तर चीनमध्ये 'बॅट वूमन'च्या नावानं लोकप्रिय असलेल्या वैज्ञानिक क्षी झेंगली यांच्या कामाचंही चीन सरकारनं कौतुक केलं आहे. क्षी झेंगली या वुहान प्रयोगशाळेत पशूंवर आधारिता व्हायरसचा शोध घेणाऱ्या विभागाचं नेतृत्व करतात. चीनच्या वुहान प्रयोगशाळेनं कोरोना महामारीच्या कारणांची व्यापक आणि व्यवस्थित स्वरुपात तपास केला. त्यामुळे कोरोना विरोधातील लसीचा शोध घेता येऊ शकला, असं चायना अकॅडमी ऑफ सायन्सनं म्हटलं आहे. यासोबतच वुहान प्रयोगशाळेनं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी महत्वपूर्ण वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाचं समर्थन करत काम केलं, असंही नमूद करण्यात आलं आहे. 

वुहान प्रयोगशाळेत विविध प्रजातींचे वटवाघूळ
वुहान प्रयोगशाळेतून वटवाघळांवर सुरू असलेल्या संशोधनातूनच कोरोना विषाणू लीक झाल्याचा आरोप जगभरातून केला जात असतानाच चीननं कोरोना काळात उत्तम कार्यासाठी वुहान प्रयोगशाळेचा गौरव केला आहे. कोरोना विषाणू वुहान प्रयोगशाळेतून लीक होऊन जवळच असलेल्या वुहान वेट मार्केटमध्ये पोहोचला आणि तिथूनच त्याचा प्रसार वाढल्याचं सांगण्यात येत आहे. याच ठिकाणी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. इतकंच नव्हे, तर चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील पिंजऱ्यांमध्ये विविध प्रजातिच्या वटवाघळांना ठेवण्यात येतं आणि त्यांच्यावर प्रयोग केले जातात. वुहान प्रयोगशाळेतील काही फोटो लीक झाले होते त्यातून ही माहिती समोर आली होती. 

दरम्यान, वुहान प्रयोगशाळेनं कोरोना व्हायरसचा प्रसार प्रयोगशाळेतून झालेले आरोप फेटाळून लावले असून हे चीनला आणि प्रयोगशाळेला बदनाम करण्यासाठी षडयंत्र असल्याचं म्हटलं होतं. 

Web Title: Covid 19 Lab Leak Wuhan Institute Of Virology Is Nominated For China Top Science Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.