जगावर कोरोनापेक्षा मोठं संकट येणार?; WHO कडून धोक्याचा इशारा
By कुणाल गवाणकर | Published: December 31, 2020 01:19 PM2020-12-31T13:19:51+5:302020-12-31T13:20:14+5:30
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यामुळे चिंतेत भर
नवी दिल्ली: जगातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८ कोटींच्या पुढे गेला आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १८ लाखांच्या वर गेली आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना दुसरीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. संपूर्ण जग कोरोना संकटातून बाहेर पडण्याची वाट पाहात असताना जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. यामुळे काळजीत भर पडली आहे.
कोरोनापेक्षा जास्त धोकादायक महामारी येऊ शकते. त्या संकटाचा सामना करण्याची तयारी जगानं करायला हवी. त्यासाठी गांभीर्यानं पावलं उचलायला हवीत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) दिला आहे. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख मायकल रेयान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नव्या संकटावर भाष्य केलं. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा विषाणू जगभरात वेगानं पसरला. जगाच्या कानाकोपऱ्यात याचा परिणाम पाहायला मिळाला. मात्र ही महामारी सर्वात मोठी महामारी असेलच असं नाही, असं मायकल रेयान म्हणाले. 'कोरोना विषाणूचं वेगानं संक्रमण झालं. त्याच्या फैलावाचा वेग जास्त आहे. या विषाणूमुळे लाखो लोकांचा जीव गेला. मात्र अन्य रोगांचा विचार केल्यास कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे,' असं रेयान यांनी सांगितलं.
भविष्यात कोरोनापेक्षाही मोठी संकटं येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. आपल्याला भविष्यात कोरोनापेक्षा जास्त गंभीर संकटांसाठी तयार राहायला हवं, असं रेयान म्हणाले. कोरोना विषाणूचा सामना करताना वैद्यकीय आघाडीवर जगानं बरीच प्रगती केल्याचं डब्ल्यूएचओचे वरिष्ठ सल्लागार ऐलवॉर्ड म्हणाले. कोरोनावरील लसींचा वापर सुरू झाला आहे. पण भविष्यात येणाऱ्या महामारींच्या दृष्टीनं फारशी तयारी नसल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.