कोविड-१९ नंतर आता कोविड-२०चं संकट?; टेन्शन वाढलं, संपूर्ण जग धास्तावलं 

By कुणाल गवाणकर | Published: December 22, 2020 08:23 AM2020-12-22T08:23:16+5:302020-12-22T08:23:38+5:30

ट्विटरवर कोविड-२० ची चर्चा; हॅशटॅग ट्रेंडमध्ये

covid 20 trending on social media after new strain of corona found in britain | कोविड-१९ नंतर आता कोविड-२०चं संकट?; टेन्शन वाढलं, संपूर्ण जग धास्तावलं 

कोविड-१९ नंतर आता कोविड-२०चं संकट?; टेन्शन वाढलं, संपूर्ण जग धास्तावलं 

Next

मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं संपूर्ण जग धास्तावलं आहे. यानंतर ब्रिटन आणि युरोपहून येणाऱ्या विमानांची वाहतूक रोखण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे. भारत सरकारनंदेखील कालच ब्रिटनमधून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला. ही बंदी ३१ डिसेंबरपर्यंत कायम असेल. कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक असल्यानं अनेक देशांकडून खबरदारी घेतली जात आहे. 

सध्याच्या घडीला जगभरात कोरोना लसीवर संधोधन सुरू आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरू असल्यानं काही कंपन्यांच्या लसींच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. आणखीही काही देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. एकीकडे जग कोविड-१९ संकटातून बाहेर आलं नसताना आता कोविड-२० ची चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवर कोविड-२० ट्रेंडिंग आहे. कोविड-२० हॅशटॅग वापरून आतापर्यंत हजारो ट्विट्स करण्यात आली आहेत.



कोरोनाचा पहिला विषाणू २०१९ मध्ये चीनच्या वुहानमध्ये सापडला. त्यामुळे त्याला कोविड-१९ म्हटलं गेलं. वुहानमधून हा विषाणू आधी चीनमध्ये आणि मग संपूर्ण जगात पसरला. आता ब्रिटनमधून आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या आणि जास्त धोकादायक स्ट्रेननं जगाची चिंता वाढवली आहे. नवा स्ट्रेनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

ट्विटरवर कोविड-२० ट्रेंडिंग
कोणत्याही नव्या विषयावर नेटकऱ्यांनी हॅशटॅग वापरून मोठ्या संख्येनं ट्विट करण्यास सुरुवात केल्यावर तो विषय ट्रेंडिंग ठरतो. अनेक जण मीम्स शेअर करतात. काही जण यातूनही लोकांना सतर्क करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही तासांमध्ये कोविड-२० चा हॅशटॅग वापरून हजारो ट्विट्स केली गेली आहेत. त्यामुळे #Covid-20 ट्रेंडमध्ये आहे.



ब्रिटनमध्ये हाहा:कार
कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, चिली, बग्लेरिया आणि दक्षिण अरबकडून ब्रिटनच्या प्रवासावर बंदीची घोषणा केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे दक्षिण इंग्लंडमधील बाजार ख्रिसमस आधीच बंद करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये चतुर्थ श्रेणीच्या कडक लॉकडाउनची घोषणा बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. 

नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली
ब्रिटनमध्ये आढळलेला नवीन स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. याचा अर्थ असा आहे की नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो. लोकांना दिले जात असलेली कोरोनाची लस नवीन स्ट्रेनविरूद्ध लढण्यातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि शरीरावर प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार झाल्यामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसंच सण साजरा करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत. 
 

 

Web Title: covid 20 trending on social media after new strain of corona found in britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.