जे शिकले ते कामी आलं; मृत्यूच्या दाढेतून त्यानं मित्राला परत आणलं, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 05:58 AM2024-07-05T05:58:06+5:302024-07-05T05:59:04+5:30
न्यू जर्सी येथे जे. जे. नेहमीप्रमाणे त्याच्या संघातल्या एका मित्राच्या म्हणजे जिओव्हनीच्या घरी गेला होता. तेथे तो ट्रेडमिलवर सराव करत होता. सराव सुरू असतानाच तो अचानक कोसळला आणि काही काळासाठी त्याचे हृदय बंद पडले.
‘मी जर त्या दिवशी इतर कुठे तरी असतो तर आज जिवंत राहू शकलो नसतो, तुम्हाला दिसू शकलो नसतो, इथे होतो म्हणून वाचलो’ जे. जे. मचनिक आपल्या मित्राबद्दल म्हणत होता. मित्राने त्याच्या छोट्याशा कृतीने जे.जे.ला जीवदान दिलं होतं. आपल्या मित्रामुळेच जे.जे. जीवघेण्या संकटातून वाचला. प्रत्येकाला एक तरी मित्र असावा आणि तो एकवेळ सुखाच्या वेळी उपस्थित नसला तरी चालेल; पण दु:खाच्या वेळी नक्की हजर असावा याचा प्रत्यय त्याला आला.
अमेरिकेतील न्यू जर्सीतील अटलांटा येथे राहणारा जे.जे. मचनिक हा १८ वर्षाचा मष्टियोद्धा. जिओव्हनी स्क्याफिडी हा त्याचा जिवलग मित्र. जे.जे. त्यादिवशी जिओव्हनीच्या घरी ट्रेडमिलवर सराव करत असताना अचानक चक्कर येऊन पडला. काही काळासाठी त्याचे हृदयच बंद पडले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या जिओव्हनी आणि त्याच्या भावाने त्यांना नुकत्याच देण्यात आलेल्या सीपीआर ट्रेनिंगचा उपयोग करून जे.जे.ला जीवदान दिले. वेळ न दवडता जिओव्हनीच्या आईने देखील रुग्णवाहिका बोलवून त्याला दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली. तेथे त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले.
सगळ्या गोष्टी सुदैवाने वेळेत मिळत गेल्याने जे.जे. आता व्यवस्थित बरा झाला आहे. मित्रांनी परिस्थिती ओळखून जे.जे.ला तत्काळ सीपीआर दिल्याने खूप फायदा झाल्याचे डॉक्टरांनीही मान्य केले. न्यू जर्सी येथे जे. जे. नेहमीप्रमाणे त्याच्या संघातल्या एका मित्राच्या म्हणजे जिओव्हनीच्या घरी गेला होता. तेथे तो ट्रेडमिलवर सराव करत होता. सराव सुरू असतानाच तो अचानक कोसळला आणि काही काळासाठी त्याचे हृदय बंद पडले. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका देखील आला. मित्राच्या आईने परिस्थिती पाहून रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिका येईपर्यंत तिथे उपस्थित असलेल्या जिओव्हनीने आपल्या भावाच्या मदतीने जे.जे.ला सीपीआर दिला. अतिशय महत्त्वाच्या वेळी जे.जे.ला मिळालेल्या सीपीआरचा खूप फायदा झाला.
जे.जे. लवकरच होणाऱ्या मुष्टियुद्धाच्या मॅचेसचा सराव करण्यासाठी जिओव्हनीच्या घरी आला होता. तेथून ते मित्र जिममध्ये जाणार होते. मर्लाना होर्डगिन या जिओव्हनीच्या आई. आपल्या मुलाबरोबर असणाऱ्या जे.जे.ला त्याही चांगल्या ओळखायच्या. स्पर्धेसाठी आपल्या मुलाचा आणि त्याच्या मित्रांचा कसा सराव सुरू आहे हे पाहण्यासाठी त्यादेखील जिममध्ये जाणार होत्या. स्वत:चं आवरून त्या घराचा जिनाच उतरत होत्या आणि त्यांना जे.जे. चक्कर येऊन खाली कोसळल्याचं दिसलं. ते दृश्य पाहून खरं तर त्या थिजून गेल्या होता. जोरजोरात श्वास घेणारा आणि नंतर मलूल होत जाणारा जे.जे.ला पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. त्या धावत जे.जे.च्या जवळ आल्या. जिओव्हनी जोरात किंचाळल्यावर त्या भानावर आल्या आणि परिस्थितीचं गांभीर्य पाहून त्यांनी लगेचच रुग्णवाहिकेला फोन केला.
जिओव्हनीचा आवाज ऐकून त्याचा लहान भाऊ ट्रेव्हर खाली आला. त्या दोघांनी जे.जे.ला ट्रेडमिलवरून खाली उतरवले. ट्रेडमिल बंद केले. या सगळ्यांनी जे.जे.ला उचलून घरातल्या मोकळ्या जागेत हलवले. रुग्णवाहिका येईपर्यंत मुलांनी सूत्रं हातात घेतली. जिओव्हनीच्या एका छोट्याशा कृतीने मोठा चमत्कार केला. जिओव्हनी त्या प्रसंगाबद्दल बोलताना म्हणतो, रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतर माझी आई सारखी जे.जे. श्वास घेतो आहे का, असं विचारात होती. आईच्या बोलण्यानंतर आम्हाला परिस्थितीची जाणीव झाली. आम्हा दोघा भावांनी तत्काळ जे.जे.ला सीपीआर द्यायला सुरुवात केली. आम्ही दोघे जे.जे.च्या छातीवर दाब देऊन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही त्याला ३ सीपीआर दिले. ते संपेपर्यंत पोलिस तिथे आले व त्यांनी तत्काळ जे.जे.ला दवाखान्यात नेले.
ट्रेव्हर म्हणतो, ‘तो प्रसंग आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आम्ही दोघं एक चांगली गोष्ट करू शकलो याचा आनंद तर आहे; पण आता या गोष्टीने आम्हा दोघांना प्रेरणा मिळाली आहे. आम्ही सीपीआरचं महत्त्व अधिकाधिक लोकांना पटवून देणार आहोत. जीव वाचवण्याचं हे कौशल्य जितके जास्त जण शिकून घेतील, तितकं अधिकाधिक लोकांना जीवदान मिळू शकेल, असं या दोघा भावांना वाटतं.
जे शिकले ते कामी आले!
जीओव्हेनी आणि ट्रेव्हर या दोघांचे वडील स्टीव्हन होडगिन हे न्यूजर्सी राज्यात घोडदळातील सैनिक आणि सीपीआर प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तीन वर्षापूर्वी त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना सीपीआर कसे करायचे याचे सविस्तर प्रशिक्षण दिले होते, जे मित्राचे प्राण वाचवण्याच्या कामी आले. जे.जे.वर तेथील डॉक्टर मॅथ्यू मार्टिनेझ यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार केले. हळूहळू तो बरा झाला. डॉक्टर म्हणाले, जे. जे. जवळपास गेलेलाच होता. त्याचे हृदय बंद पडले होते. सीपीआरमुळे तो वाचू शकला.