जगातील सर्वात मोठ्या बुद्धमूर्तीला तडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 03:12 PM2018-10-02T15:12:11+5:302018-10-02T15:23:28+5:30
जगातील सर्वात मोठी बुद्धमूर्ती अशी ओळख असलेल्या बुद्ध प्रतिमेला तडे गेले आहेत.
बीजिंग - जगातील सर्वात मोठी बुद्धमूर्ती अशी ओळख असलेल्या चीनमधील दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतातील बुद्ध प्रतिमेला तडे गेले आहेत. त्यामुळे पुढील चार महिने या मूर्तीच्या देखभाल दुरुस्तीचे काम चालणार असून, त्यादरम्यान, विविध चाचण्या घेऊन मूर्तीची तपासणी केली जाणार आहे.
लेशान शहराच्या बाहेरील भागात बनवण्यात आलेल्या ७१ मीटर उंच असलेल्या या बुद्धमूर्तीच्या छाती आणि पोटाकडील भागाला तडे गेले आहेत. तसेच काही ठिकाणी ही मूर्ती तुटली आहे. लेशान बुद्ध क्षेत्रातील प्रबंधन समितीने ही माहिती दिली आहे.
८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तपासणी प्रक्रियेदरम्यान, बुद्धाच्या मूर्तीचा मुख्य भाग अंशत: किंवा पूर्णपणे झाकून ठेवण्यात येईल. सांस्कृतिक स्मृतिचिन्हांबाबत तज्ज्ञ असलेल्यांच्या निरीक्षणाखाली मूर्तीची तपासणी केली जाईल. त्यासाठी ३डी लेझर स्कॅनिंग, इंफ्रारेड थर्मल इमेजिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. तसेच ड्रोणद्वारे हवाई सर्वेक्षणही केले जाईल,
सर्वात मोठी बुद्धमूर्ती असलेल्या या मूर्तीच्या निर्मितीसाठी सुमारे ९० वर्षांहून अधिक काळ लागला होता. या मूर्तीची निर्मिती तांग वंश (६१८ ते ९०७) या राजघराण्याच्या शासनकाळात ७१३ साली सुरू झाली होती. युनेस्कोकडून जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित झालेल्या या बुद्धमूर्तीची अनेकदा, देखभाल आणि दुरुस्ती झाली आहे.