अंडाशय आणि वीर्याविना केली मानवी भ्रूणाची निर्मिती, स्टेम सेल्सचा वापर करून केले संशाेधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 08:57 AM2023-06-18T08:57:02+5:302023-06-18T08:57:42+5:30

केंब्रिज विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनामध्ये स्टेम सेल्सचा वापर करून मानवी कृत्रिम भ्रूणाची निर्मिती करण्यात आली.

Creation of human embryos without ovaries and sperm, modified using stem cells | अंडाशय आणि वीर्याविना केली मानवी भ्रूणाची निर्मिती, स्टेम सेल्सचा वापर करून केले संशाेधन

अंडाशय आणि वीर्याविना केली मानवी भ्रूणाची निर्मिती, स्टेम सेल्सचा वापर करून केले संशाेधन

googlenewsNext

बोस्टन :  नैसर्गिक पद्धतीने बाळ न झाल्यास टेस्ट ट्यूब बेबी, आयव्हीएफ आदी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे आपण पाहिले असेल. परंतु अमेरिका आणि इंग्लंडमधील संशोधकांनी महिलेचे अंडाशय तसेच पुरुषांचे वीर्य न वापरताही कृत्रिमरीत्या मानवी भ्रूणाची निर्मिती केली. याबाबतची माहिती संशोधकांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर स्टेम सेल रिसर्चच्या परिषदेत नुकतीच सादर केली.

केंब्रिज विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनामध्ये स्टेम सेल्सचा वापर करून मानवी कृत्रिम भ्रूणाची निर्मिती करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार हा प्रयोग केवळ संशोधनासाठी असून वैद्यकीयदृष्ट्या त्याच्या वापराची कोणतीही शक्यता नाही. किंबहुना अशा प्रकारचे भ्रूण महिलांच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, या संशोधनाचा उपयोग जनुकीय आजारांच्या कारणांचा वेध घेण्यासाठी निश्चितच होऊ शकतो. तसेच महिलांमध्ये होणाऱ्या गर्भपाताचे कारण शोधण्यासही मदत होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

‘मानवी उत्क्रांतीचा शोध लागेल’ 
या संशोधनाचा मुख्य उद्देश हा प्रामुख्याने स्टेम सेल्सचा वापर करून मानवी भ्रूण विकसित करता येणे शक्य आहे, का हे तपासणे होते. त्यात यश आल्याने स्टेम सेल्समध्ये अधिक संशोधन केल्यास मानवी उत्क्रांती कशी झाली, याचाही शोध लावता येईल, असे मत स्टेम सेल बायोलॉजी ॲण्ड डेव्हलपमेंट जेनेटिक्सचे प्रमुख रॉबिन लॉवेल यांनी व्यक्त केले.

‘नैतिक प्रश्न निर्माण होतील’
 कृत्रिमरीत्या मानवी भ्रूणनिर्मिती वैज्ञानिक आणि वैद्यकीयदृष्ट्या संशोधनासाठी फायदेशीर असले, तरी त्यासंदर्भात संशोधकांनी अनेक नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित केले. कृत्रिम भ्रूणांची वाढ, वागणूक मानवी भ्रूणांसारखी होईल का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. यापूर्वी काही संशोधकांनी माकडांबाबत प्रयोग केले होते. मात्र, ते माकडांच्या गर्भाशयात वाढू शकले नाही, तसेच भ्रूणांच्या वापराबाबत कुठलीही नियमावली नसल्याचे त्याचा गैरवापर होऊ नये, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.  

‘भ्रूण जगणे अवघड’
प्रयोगशाळेत १४ दिवसांपर्यंतचे मानवी भ्रूण विकसित करण्यासाठी कायदेशीर मान्यता आहे. हा कालावधी नैसर्गिकरीत्या अंडाशय फलित झाल्यानंतर ते गर्भाशयात येण्यापर्यंतचा असतो. त्यामुळे प्रयोगशाळेत विकसित भ्रूण १४ दिवसांमध्ये गर्भाशयात प्रत्यारोपित करावा लागतो. १४ दिवसांनंतरही भ्रूण प्रयोगशाळेत जिवंत ठेवण्याचे कुठलेही तंत्रज्ञान उपलब्ध नाही; परंतु कृत्रिम भ्रूण हा १४ दिवसांनंतरच्या कालावधीनंतर विकसित झाला आहे. त्यामुळे त्याच्या जगण्याची तूर्तास शाश्वती नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

Web Title: Creation of human embryos without ovaries and sperm, modified using stem cells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.