अमेरिकेत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 01:00 PM2017-09-02T13:00:45+5:302017-09-02T13:02:42+5:30
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात तलावात पोहण्यासाठी गेला असता बुडून मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत
ह्युस्टन, दि. 2 - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात तलावात पोहण्यासाठी गेला असता बुडून मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. निखिल भाटिया असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. टेक्सासच्या एअँडएम विश्वविद्यालयात निखिल भाटिया शिकत होता. तो आपल्या मैत्रिणीसोबत ब्रायन तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला होता.
निखिल भाटिया हा मूळचा जयपूरचा आहे. तर त्याची मैत्रीण शालिनी सिंह नवी दिल्ली येथील रहिवासी आहे. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा दोघांची प्रकृती गंभीर होती. अखेर निखील भाटियाचा बुधवारी मृत्यू झाला. शालिनी सिंहची प्रकृती अद्याप गंभीर आहे अशी माहिती भारतीय दूतावासाच्या अधिका-यांनी दिली आहे. शालिनी सिंहदेखील निखिल भाटिया शिकत असलेल्या विद्यापीठातून पब्लिक हेल्थमध्ये मास्टर्स करत होती.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, निखिल आणि त्याची मैत्रिण तलावात पोहत होते. मात्र अचानक पाणी वाढले आणि पाण्याचा वेगही वाढला. त्यात ते खेचले गेले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी स्थानिक पोलिसांना मदतीसाठी बोलावल्यानंतर निखिल आणि त्याच्या मैत्रिणीला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी आई आणि मित्रांच्या उपस्थितीत निखील भाटियाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय दूतावासाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार , निखील भाटियाची आई सुमन भाटिया 4 सप्टेंबरला भारतात जाणार आहे. यावेळी त्याच्या अस्थी त्या सोबत नेणार आहेत. निखील हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर हार्वे वादळाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ह्युस्टन येथे या वादळात आतापर्यंत २०० विद्यार्थी अडकलेले आहेत. गेल्या तेरा वर्षांमध्ये अमेरिकेत एवढे महाभयंकर वादळ धडकले नव्हते. हार्वे वादळाचा तडाका टेक्सास या प्रांताला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यात तब्बल 1.3 कोटी लोक प्रभावित झाले असून, अनेकांची घरे कोसळली आहेत. रस्त्यावरील खांब आणि झाडेही उन्मळून पडली आहेत. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
२०० भारतीय विद्यार्थी वादळात अडकले
टेक्सास राज्याच्या ह्युस्टन शहराच्या विद्यापीठात शिकणारे २०० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न भारतीय वाणिज्य दूतावासातर्फे करण्यात येत आहेत. भारताचे महावाणिज्यदूत अनुपम राय यांनीही आम्ही टेक्सासमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी इथे असल्याचे दिलासा देणारे ट्विट केले आहे. ह्युस्टनमधील स्थानिक रहिवासीही भारतीयांना मदत करत आहे.