भारत-पाकिस्तानला जोडणारा दुवा 'क्रिकेट'

By admin | Published: June 2, 2016 01:31 PM2016-06-02T13:31:00+5:302016-06-02T13:31:00+5:30

भारत-पाकिस्तान या दोन शेजा-यांमध्ये जितकी कटूतेची भावना आहे तितक्याच या दोघांना जोडणा-या समान गोष्टीही आहेत.

'Cricket' link to Indo-Pak | भारत-पाकिस्तानला जोडणारा दुवा 'क्रिकेट'

भारत-पाकिस्तानला जोडणारा दुवा 'क्रिकेट'

Next

ऑनलाइन लोकमत 

भारत-पाकिस्तान या दोन शेजा-यांमध्ये जितकी कटूतेची भावना आहे तितक्याच या दोघांना जोडणा-या समान गोष्टीही आहेत. कारण धर्म बाजूला ठेवला तर, क्रिकेट, संस्कृती, चित्रपट या दोन्ही देशांना जोडणा-या समान गोष्टी आहेत. भारत-पाकिस्तान संबंधात नेहमीच क्रिकेटने महत्वाची भूमिका बजावली आहे. 

दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले गेल्यानंतर पुन्हा दोन्ही देशातील जनतेला जवळ आणण्यासाठी राज्यकर्त्यांनी क्रिकेटचा मोठया खुबीने वापर केला आहे तसेच राजकीय संबंध बिघडल्यानंतर क्रिकेटलाही नेहमीच त्याची किंमत चुकवावी लागली आहे. भारत-पाकिस्तानच्या क्रिकेटकडे खुन्नस, इर्षा, ठसनच्या पलीकडे जाऊन बघितले तर, दोन्ही देशांनी नेहमीच जागतिक क्रिकेटला अव्वल दर्जाचे खेळाडू दिले आहेत. 
 
दहशतवादाच्या घटनांमुळे भारतीयांच्या मनात पाकिस्तानबद्दल अढी असली तरी, इमरान खान, वसिम अक्रम, जावेद मियाँदाद, सईद अन्वर, अब्दुल कादीर या प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा नेहमीच भारतीयांनी आदर केला आहे. पाकिस्तानातही सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, कपिलदेव, एम.एस.धोनी, विराट कोहली या भारतीय क्रिकेटपटूंचे चाहते कमी नाहीत. दोन्ही देशातील क्रिकेटपटूंची यादी खूप मोठी आहे पण आम्ही निवडक क्रिकेटपटूंचा उल्लेख करत आहोत. 
 
भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधात अनेक ऐतिहासिक क्षण आहेत जे क्रिकेट रसिकाच्या आठवणीत आजही ताजे आहेत. जावेद मियाँदादने शेवटच्या चेंडूवर ठोकलेला तो षटकार आजही भारतीय विसरलेले नाहीत. आशिया कपचा भारत-पाकिस्तानमध्ये शारजाच्या स्टेडियमवर अंतिम सामना सुरु होता. 
 
प्रथम फलंदाजी करताना भारताने २४५ धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी चार धावांची आवश्यकता होती. भारताच्या चेतन शर्माच्या हाती चेंडू होता. समोर जावेद मियाँदाद ११० धावांवर फलंदाजी करत होता. जावेद चेंडू सीमापार पाठवेल असे कोणालाही वाटले नव्हते. चेतन शर्माने चेंडू यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात फुलटॉस चेंडू टाकला आणि एक नवा इतिहास लिहीला गेला. जावेदने थेट षटकार ठोकला आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधात नवा अध्याय लिहीला गेला. आजही हा षटकार विस्मृतीत गेलेला नाही. 
 
टी-२० च्या पहिल्याच वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये अंतिम सामना सुरु होता. जोहान्सबर्गच्या वॉंडर्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताने पाकिस्तानला विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य दिले. पाकिस्तानच्या मिस्बा उल हकने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करुन पाकिस्तानला सामन्यामध्ये आणले होता. भारताचा जोगिंदर शर्मा शेवटचे षटक टाकत होता. समोर मिस्बा उल हक होता. ४३ धावांवर खेळणा-या मिसबाने जोगिंदरचा चेंडू स्कूप करण्याच्या प्रयत्नात यष्टीपाठी मारलेला फटका श्रीसंतने झेल घेतला आणि विजयाच्या तयारीत असलेला पाकिस्तानी संघाला हात डोक्यावर मारावे लागले. अजूनही या सामन्याचा थरार क्रिकेट रसिकांच्या मनात ताजा आहे. 
 
 
भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटचा इतिहास खूप रंजक आहे 
- १९५२-५३ साली भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट पर्वाला सुरुवात झाली. त्यावेळी पाकिस्तानी संघ भारत दौ-यावर आला होता. पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली होती. 
 
- त्यानंतर १९५४-५५ साली भारतीय संघ पाकिस्तान दौ-यावर गेला. त्यावेळी ही मालिका अनिर्णिती राहिली होती. पाचही कसोटी सामने ड्रॉ झाले होते. 
 
- १९६२ ते १९७७ नंतर भारत-पाकिस्तानमध्ये एकही क्रिकेट मालिकेला खेळली गेली नाही. त्या दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये १९६५ आणि १९७१ युद्ध लढली गेली. 
 
- १९७८-७९ मध्ये १८ वर्षानंतर भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका पाकिस्तानने २-० ने जिंकली. 
 
- त्यानंतर १९८९-९० पर्यंत क्रिकेट संबंध सुरळीत चालू होते. त्यानंतर आठ वर्षांनी झालेली मालिका पाकिस्तानने जिंकली. 
 
- १९९९ साली कारगिल युद्ध झाल्यानंतर पुन्हा पाच वर्ष दोन्ही देशांमध्ये कुठलीही क्रिकेट मालिका झाली नाही.  २००४ साली अटलबिहारी वाजपेयी यांनी संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटचा आधार घेतला. भारतीय संघ पाकिस्तान दौ-यावर गेला. भारताने ही मालिका जिंकली. 
 
- २००७-०८ मध्ये भारतीय संघ पाकिस्तान बरोबर शेवटची कसोटी मालिका खेळला. भारताने ही मालिका जिंकली. २००८ साली पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केल्यानंतर पुन्हा क्रिकेट संबंधात खंड पडला. 
 
भारत - पाकिस्तान  क्रिकेट सामन्यातील वादग्रस्त क्षण
 
जावेद मियॉंदाद - किरण मोरे
१९९२ विश्‍वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना आजही प्रेक्षकांना आठवतो तो जावेद मियाँदाद आणि किरण मोरे मधल्या शाब्दीक चकमकीसाठी. पाकिस्‍तानच्‍या मियाँदादने उडया मारुन विकेटकीपर किरण मोरेला डिवचण्‍याचा प्रयत्‍न केला होता. सामन्‍यानंतर जावेदवर खूप टीक झाली. मियाँदादने या सामन्‍यात ११० चेंडूत फक्‍त ४० धावा केल्‍या होत्‍या.
 
व्‍यंकटेश प्रसाद - आमिर सोहैल
१९९६ च्‍या विश्‍वचषकात भारत-पाकिस्‍तान सामन्या दरम्यान व्यंकटेश प्रसादच्या गोलंदाजीवर सोहेलने चौकार लगावून अर्धशतक पूर्ण केले. त्यावेळी सोहैलने तुझ्या प्रत्येक चेंडूची जागा सीमारेषेबाहेर असल्याचे बॅटीने इशारा करुन डिवचले. खवळलेल्या प्रसादने पुढच्याच चेंडूवर सोहैलला क्लीनबोल्ड करत मैदानाबाहेर चालत हो असे हाताच्या इशा-याने सुनावले. 
 
 
आसिफ इक्बाल - गुंडप्पा विश्वनाथ 
१९८०मध्ये पाकिस्तानचे माजी कर्णधार आसिफ इक्बाल यांचा अखेरचा कसोटी सामना भलत्याच कारणासाठी गाजला किंवा वादग्रस्त ठरला. कलकत्त्यात भारताविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या या सामन्याचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारताचा तो पहिला सामना होता. नाणेफेकीच्या वेळी विचित्र प्रसंग घडला. नाणेफेक विश्वनाथ यांनी जिंकली. पण नाणे हवेत असतानाच आसिफ यांनी ‘अभिनंदन’ असे म्हटल्याचा विश्वनाथ यांचा दावा होता. या सामन्यात विश्वनाथ नाणेफेक जिंकतील, या शक्यतेवर मोठे सट्टे लागल्याची चर्चा होती. आसिफ यांनी पाकिस्तानचा पहिला डाव भारताच्या धावसंख्येच्या ५९ धावा आधीच घोषित करून संशय वाढवला होता.
 
 
आशीष नेहरा - अन्वर
२००३ च्‍या विश्‍वचषकात सईन अन्‍वर भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता. भारतीय गोलंदाजांची खिल्‍ली उडवित होता. त्‍यावेळी आशिष नेहराने त्‍याला बाद केले ल तंबूकडे अंगुलीनिर्देश केला. अन्‍वर नेहराकडे रागाने पाहत तंबूत परतला.
 
सचिन - शोएब
१५ नोव्‍हेंबर, २००७  रोजी एकदिसीय सामन्‍यात शोएब अख्‍तरने सचिनला डिवचण्‍याचा प्रयत्‍न केला. सचिनने मौन बाळगत आपल्‍या खेळीने अख्‍तरला प्रतिउत्‍तर दिले.
 
गौतम गंभीर - शाहिद आफ्रीदी
कानपूरमध्‍ये खेळल्‍या गेलेल्‍या सामन्‍यामध्‍ये गौतम गंभीर धाव घेत असताना शाहिद आफ्रीदी मध्‍ये आला. दोघांचीही टक्कर झाली. दोघांत बाचाबाची सुरु होत असताना पंचांनी प्रकरण शांत केले.
 
गौतम गंभीर - कामरान अकमल
आशिया चषक २०१० मध्‍ये पाकिस्‍तानी विकेटकीपर कामरान अकमल गौतम गंभीरविरुध्‍द जोरजोरात अपील करत होता. त्‍यामुळे रागावलेल्‍या गंभीरने त्‍याला आवाज कमी करण्‍यासाठी खडसावले. त्‍यामुळे दोघात वाद झाला. धोनी आणि पंचांनी हे प्रकरण शांत केले.
 
इशांत शर्मा - कामरान अकमल
डिसेंबर २०१२ मध्‍ये टी २० सामन्‍यात ईशांत शर्माने अकमलला डिवचले. अकमल रागात येऊन ईशांतकडे गेला. त्‍यावेळी सुरेश रैनाने दोघांनाही शांत केले.
 
हरभजन सिंग - शोएब अख्तर
आशिया चषक २०१० मध्‍ये भारत धावांचा पाठलाग करत असताना हरभजन सिंग फलंदाजीसाठी आला होता. तेव्‍हा शोएब अख्‍तरने त्‍याला चिडवले. रागात हरभजनने,'तू तुझे काम कर' असा दम दिला होता.
 
२००६ - इरफान पठाणची कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक
भारत-पाकिस्तान कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात इरफानच्या हॅटट्रिकमुळे पाकिस्तानची हालत झाली तीन बाद सहा अशी झाली होती. मग सहा बाद ३९. पण कामरान अकमलच्या झुंजार आक्रमक शतकामुळे पाकिस्तान सावरले. भारताने हा सामना तब्बल ३४१ धावांनी गमावला!
 

Web Title: 'Cricket' link to Indo-Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.