'जिवंत राहायचंय तर भारतात जा' अशी धमकी देत पाकिस्तानात हिंदू व्यापाऱ्यावर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 04:00 PM2022-02-02T16:00:54+5:302022-02-02T16:05:41+5:30

Pakistan Crime News : मृत्यूपूर्वी हल्ल्यात जखमी झालेल्या सुतान लाल यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

Crime News pakistan hindu trader shot dead in ghotki sindh was told to go to india before being killed | 'जिवंत राहायचंय तर भारतात जा' अशी धमकी देत पाकिस्तानात हिंदू व्यापाऱ्यावर झाडल्या गोळ्या

'जिवंत राहायचंय तर भारतात जा' अशी धमकी देत पाकिस्तानात हिंदू व्यापाऱ्यावर झाडल्या गोळ्या

googlenewsNext

कराची - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यामध्ये सोमवारी एका हिंदू व्यापाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुतान लाल देवान असं या हिंदू व्यापाऱ्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. सुतान यांनी हत्ये अगोदर काही दिवसांपूर्वी आपल्याला काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. 'जिवंत राहायचं असेल तर भारतात निघून जा' अशा धमक्या दिल्या जात असल्याचं म्हणत सुतान यांनी पोलिसांकडे मदत मागितली होती.

पाकिस्तानी वृत्तपत्र 'फ्रायडे टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, सुतान एका कपड्यांच्या कारखान्याचं उद्घाटन करून आपल्या घरी परतत असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असणारा एक नातेवाईक हरीश कुमार हेदेखील गंभीर जखमी झालेत. हरीश कुमार यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृत्यूपूर्वी हल्ल्यात जखमी झालेल्या सुतान लाल यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपल्यावर हल्ला झाला असून आपल्या जीवाला धोका असल्याचं सुतान लाल म्हणत असताना दिसून येत आहेत. जमिनीच्या वादातून आपल्या भाच्यानेच इतर चार जणांसहीत आपल्यावर हल्ला केल्याचंही सुतान यांनी या व्हिडिओत म्हटलं.  'पाकिस्तान हीच आपली मायभूमी आणि कर्मभूमी' असल्याचं सांगत सुतान यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचंही स्पष्टपणे म्हटलं होतं. 

सुतान यांनी पोलिसांनी अनेकदा धमकीबद्दल सांगितलं पण काहीच कारवाई झाली नसल्याचं म्हटलं आहे. व्यापाऱ्याच्या हत्येविरोधात या भागातील दुकानं बंद ठेवण्यात आली. पाकिस्तानातील विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज गटाकडून या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. एका ख्रिश्चन व्यापाऱ्याच्या हत्येनंतर आता एका हिंदू नागरिकाची हत्या करण्यात आल्याचं म्हणत देशात अल्पसंख्यांकांना सर्वाधिक धोका आणि भीती सतावत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: Crime News pakistan hindu trader shot dead in ghotki sindh was told to go to india before being killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.