"1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांची पाकमध्ये बडदास्त"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 06:21 AM2022-01-20T06:21:05+5:302022-01-20T06:21:51+5:30
दाऊद टोळीचे नाव न घेता भारताचा हल्लाबोल
न्यूयॉर्क : १९९३ साली मुंबईमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेला कुख्यात दहशतवादी व त्याच्या टोळीतील साथीदार पाकिस्तानमध्ये पंचतारांकित पाहुणचार झोडत आहेत. पाकिस्तानने त्यांना सुरक्षा व्यवस्थाही पुरविली आहे, असा जोरदार हल्लाबोल भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी दाऊद इब्राहिम टोळीचे नाव न घेता केला.
ग्लोबल काऊंटर टेररिझम कौन्सिलने आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेत त्यांनी सांगितले की, दहशतवाद व संघटित गुन्हेगारी यांच्यात घनिष्ठ संबंध असतो. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. १९९३ साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडविणाऱ्या टोळीतील साथीदार पाकिस्तानात ऐषोआरामात जगत आहेत.
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये राहात असल्याचे तेथील सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये मान्य केले होते. ८८ दहशतवादी गट व त्यांच्या प्रमुखांवर पाकिस्तानने अनेक निर्बंध लादले होते. त्यामध्ये दाऊद इब्राहिमचेही नाव होते.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रमुखपदी यंदाच्या वर्षासाठी टी. एस. तिरुमूर्ती यांची निवड झाली आहे. ते म्हणाले की, जगभरातील दहशतवाद्यांना पुरविली जाणारी आर्थिक तसेच शस्त्रास्त्रांची रसद तोडण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी अनेक कडक निर्बंध घातले आहेत. मात्र त्या निर्बंधांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. (वृत्तसंस्था)
भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोह्मद या पाकिस्तानी संघटनांचे अल् कायदाशी असलेले संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत.
अफगाणिस्तानात नुकत्याच घडलेल्या घटनांनी या दहशतवादी संघटनांना नवे बळ मिळाले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आपली काम करण्याची पद्धत बदलली. सिरिया व इराकमधील आपली पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याकडे या संघटनेने आता लक्ष दिले आहे.