जगभरातल्या गुन्हेगारी टोळ्या झाल्या सक्रीय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:21 PM2020-04-03T12:21:27+5:302020-04-03T12:21:46+5:30
सारेच जण हवालदिल आणि गर्भगळीत झालेले असले तरी असेही अनेक जण आहेत, त्यांच्यासाठी कोरोनाची साथ इष्टापत्ती ठरली आहे. या साथीतून ते आपलं उखळं पांढरं करून घेताहेत. कोट्यवधी रुपये कमवताहेत.
- लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या संकटानं अख्खं जग भयभीत झालं आहे. हे संकट आता मानवजातीला कुठे घेऊन जाणार, जगभरातील किती लोकांना आयुष्यातून उठवणार, या संकटातून आपण जगणार की नाही, याचीही काहीच शाश्वती राहिलेली नाही. र्शीमंतांपासून ते कष्टकरी, मजुरांपर्यंत सर्वांच्याच डोक्यावर कोरोनानं मृत्यूच्या भयाची टांगती तलवार सज्ज ठेवली आहे.
सारेच जण यामुळे हवालदिल आणि गर्भगळीत झालेले असले तरी असेही अनेक जण आहेत, त्यांच्यासाठी कोरोनाची साथ इष्टापत्ती ठरली आहे. या साथीतून ते आपलं उखळं पांढरं करून घेताहेत. कोट्यवधी रुपये कमवताहेत. कोरोनाच्या काळात अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले, कुठूनही पैसा येण्याचे मार्ग बंद झाले, पण या लोकांकडे मात्र पैशांच्या राशी जमा होताहेत.
कोण आहेत हे लोक? आणि नेमका कसा होतोय त्यांना फायदा?
सायबर गुन्हेगारांचं या काळात चांगलंच फावलं आहे. त्यांच्या अनेक संघटित टोळ्या निर्माण झाल्या आहेत आणि जगभरात त्यांनी धुमाकुळ घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या संकटातून कसाबसा आपला जीव वाचवण्याच्या चिंतेत असणार्या सर्वसामान्य लोकांच्या तोंडातला घासही काढून घेताना त्यांनी आशेवर असणार्या लोकांना आणखीच मरणाच्या खाईत ढकललं आहे.
जगभरात वैद्यकीय सेवेचा आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा असताना या भामट्यांनी नेमक्या याच वस्तूंचा ‘पुरवठा’ सुरू केला आहे. पण हजारो रुपये मोजूनही लोकांच्या हातात काय पडतंय, तर नकली, सबस्टॅँडर्ड वस्तू किंवा काहीही नाही!.
अमेरिकेत कोरोनाचा कहर माजलेला असताना तिथे तर बनावट वेबसाइट्सचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे.
कोणी आपल्या वेबसाइटवरून सर्जिकल मास्क विकतंय, कोणी हॅँड सॅनिटायर्जस, कोणी अँँटिव्हायरल औषधं, कोणी व्हॅक्सिन्स, कोणी कोरोना स्प्रे, तर कोणी कोविड-19 टेस्ट किट्स !.- अर्थातच बनावट!
सगळीकडे या वस्तूंचा तुटवडा आहे, पण आपल्याला निदान इथे तरी या वस्तू मिळतील या आशेनं गरजू, हवालदिल झालेले लोक हजारो रुपये भरून आपल्या मालाची आगाऊ नोंदणी करताहेत, पण त्यांच्या हाती पडतेय ती केवळ निराशा.
या बनावट वेबसाइट्सनी त्यासाठी आधार घेतलाय, तो वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचा, जे अशी उपकरणे तयार करतात.
ैअमेरिकेच्या एका अधिकार्यानं सांगितलं, आम्ही अशा बनावट वेबसाइट्सच्या शोधात आहोत आणि रोज कितीतरी बनावट वेबसाइट्स आम्ही बंद करत आहोत. या सगळ्या वेबसाइट्सनी आपल्या नावापुढे ‘कोरोना’ किंवा ‘कोविड-19’ अशा शब्दांचा वापर केला आहे. त्यात नामांकित कंपन्यांच्या नावांचा वापर केल्याने लोक त्यांच्या आमिषांना बळी पडत आहेत. अशा वेबसाइट्स किंवा त्या विकत असलेल्या उपकरणांना, औषधांना अन्न आणि औषध प्रशासनानंही कोणतीच मान्यता दिलेली नाही.
जागतिक गुन्हेगारीवर नजर ठेवणार्या इंटरपोल या संस्थेनं तर यासंदर्भात अतिशय गंभीर इशारा दिला आहे. जवळपास शंभर देशातील शेकडो गुन्हेगारांना केवळ महिन्याभराच्या काळातच त्यांनी अटक केली आहे आणि कोट्यवधी डॉलरची रक्कमही त्यांच्याकडून जप्त केली आहे. जगभरातील या भामट्यांविरुद्ध ‘ऑपरेशन पॅँगिआ’ ही मोहीमही त्यांनी सुरू केली आहे.