संकट : चीनला सापडला गॅसचा जगातील मोठा साठा; दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 08:05 AM2024-08-09T08:05:54+5:302024-08-09T08:07:48+5:30
सध्या दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत असला तरीही हा महत्त्वाचा जलमार्ग आहे. २० टक्क्यांहून अधिक व्यापार या मार्गे होतो.
बिजींग : चीनला वादग्रस्त असलेल्या दक्षिण चीन समुद्रात अंदाजे १०० अब्ज घन मीटरपेक्षा जास्त असलेला मोठा गॅस साठा सापडला असून, यामुळे येथील भागावर दावा करणाऱ्या इतर देशांसोबतचा तणाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
चीनला अति-खोल पाण्यातले जगातील पहिले मोठे वायू क्षेत्र लिंगशुई ३६-१ गॅस क्षेत्र मिळाले आहे. येथे १०० अब्ज घन मीटरपेक्षा अधिक गॅससाठ्याचा अंदाज असून, हे क्षेत्र चीनच्या सरकारी मालकीचे असल्याचे चायना नॅशनल ऑफशोअर ऑइल कॉर्पोरेशनने (सीएनओओसी) म्हटले. सध्या दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत असला तरीही हा महत्त्वाचा जलमार्ग आहे. २० टक्क्यांहून अधिक व्यापार या मार्गे होतो.
कोणत्या देशांचा दावा?
- दक्षिण चीन समुद्रावर अनेक देशांचा दावा आहे. चीनने संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा केला आहे. तर फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांनी त्यावर प्रतिदावे केले आहेत.
- अमेरिका, युरोपियन महासंघ जपान आणि मित्र राष्ट्रांनी छोट्या देशांच्या दाव्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे हे नवीन वायू क्षेत्र सध्या सुरू असलेल्या तणावामध्ये भर घालेल, असे अभ्यासकांचे मत आहे.