Coronavirus: कोरोनाने घेरलं, भूकंपाने हादरवलं; खरं तर घरातच राहायचंय, पण घरच कोलमडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 18:02 IST2020-03-23T17:57:37+5:302020-03-23T18:02:12+5:30
कोरोना विषाणूशी लढाई सुरू असतानाच, क्रोएशियाची राजधानी झॅगरेब 140 वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरली.

Coronavirus: कोरोनाने घेरलं, भूकंपाने हादरवलं; खरं तर घरातच राहायचंय, पण घरच कोलमडलं!
चीनला हादरवणाऱ्या कोरोना विषाणूने आता जगातील 189 देशांना विळखा घातला आहे. इटली, चीन, इराण, स्पेनमध्ये 'कोविड-19' मुळे जीव गमवावा लागलेल्या नागरिकांची संख्या हजारांच्या घरात आहे. कोरोना बाधितांची संख्या तर 3 लाखांहून अधिक आहे. अनेक देशांमध्ये 'लॉकडाऊन'चे आदेश देण्यात आले आहेत. घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग राखा, अशा सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. कोरोनाविरोधात हे युद्ध सुरू असतानाच, क्रोएशियाची राजधानी झॅगरेबला रविवारी भूकंपाने हादरवलंय. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी अनेक घरांची पडझड झालीय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खरं तर घरातच राहायचंय, पण घरच भक्कम राहिलेलं नाही, अशी अवस्था अनेक कुटुंबांची झाली आहे.
क्रोएशियामध्ये कोरोना बाधितांची संख्या 200 हून अधिक आहे. एका नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. हा संसर्ग पसरू नये, यादृष्टीने खबरदारीच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू आहेत. अशातच, 140 वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने झॅगरेब शहर हादरलं. स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे सहा वाजता 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये 16 जण जखमी झाले असून एका 15 वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
भूकंपाच्या हादऱ्यांमुळे घाबरलेले नागरिक, रुग्ण घराबाहेर-हॉस्पिटलबाहेर धावले. अनेक भागात जुन्या घरांच्या भिंती रस्त्यावर कोसळल्या. घरांच्या छतांनाही तडे गेले. अनेक मोठ्या चर्चमध्ये विटांचे ढीग पाहायला मिळाले. संसदेच्या इमारतीच्या भिंतींना आणि जिन्यांनाही तडे गेलेत.
या आपत्तीमुळे क्रोएशियाची कोरोनाविरुद्धची लढाई जरा कठीणच झाली आहे. Pray for Croatia हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. त्याद्वारे नागरिक क्रोएशियातील जनतेला बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत.