युरोपियन युनियनच्या परिषदेत परराष्ट्रमंत्र्यांचा ‘किस’; मागावी लागली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 07:44 AM2023-11-07T07:44:39+5:302023-11-07T07:45:34+5:30
हा व्हिडीओ व्हायरल होताच रॅडमन यांना नेटकऱ्यांनी लक्ष्य केले. तसेच विरोधकांनीही धारेवर धरले.
क्रोएशियाचे परराष्ट्रमंत्री गॉर्डन रॅडमन (६५) यांनी बर्लिन येथे युरोपियन युनियनच्या परिषदेत ग्रुप फोटो काढताना जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालिना बेरबॉक (४२) यांचे चुंबन घेण्याचा विचित्र प्रयत्न केल्यामुळे वाद उद्भवला आहे.
बेरबॉक यांच्याशी हस्तांदोलन करत रॅडमन त्यांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करतात. अनपेक्षित प्रकाराने बेरबॉक हैराण झाल्या. फोटो सेशननंतर, बेरबॉक रॅडमनपासून एक पाऊल मागे जाऊन कोणाशी तरी बोलण्यासाठी वळल्या. तेव्हा रॅडमन पाहत राहिले, असे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते. हा व्हिडीओ व्हायरल होताच रॅडमन यांना नेटकऱ्यांनी लक्ष्य केले. तसेच विरोधकांनीही धारेवर धरले.
क्रोएशियाच्या माजी पंतप्रधान जद्रांका कोसोर यांनी ‘महिलांचे जबरदस्तीने चुंबन घेणे यालाही हिंसाच म्हणतात, नाही का?’ अशी पोस्ट करत टीका केली. त्यावर “मला माहीत नाही काय समस्या आहे, आपण नेहमी एकमेकांना प्रेमळपणे अभिवादन करतो,” असे रॅडमन म्हणाले होते. अनेक जण टीका करू लागल्यानंतर अखेर, “जर एखाद्याला त्यात काही वाईट दिसले असेल, तर मी माफी मागतो,” असे म्हणत रॅडमन यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. बेरबॉक यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.