महिलांना ड्रायव्हिंगचा हक्क देणारे क्राऊन प्रिन्स सौदीचे पंतप्रधान बनले; अरेबिया कात टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:50 PM2022-09-28T17:50:21+5:302022-09-28T17:51:41+5:30
क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी सांभाळत होते. आणखी तीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज यांनी त्यांचे उत्तराधिकाऱी व ज्येष्ठ राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांना पंतप्रधान बनविले आहे. मंगळवारी राजाने हे आदेश दिले आहेत. तर छोटा मुलगा खालिद यांना संरक्षण मंत्री बनविले आहे.
सौदीच्या राजाने अन्य दोन मंत्र्यांची देखील नियुक्ती केली आहे. प्रिंस तुर्की बिन मोहम्मद बिन फहद बिन अब्दुल अजीज यांना राज्य मंत्री आणि प्रिंस अब्दुलअजीज बिन तुर्की बिन फैसल यांना क्रीडा मंत्री बनविले आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी सांभाळत होते, परंतू किंग सलमान यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पंतप्रधान बनविण्यात आले आहे. सलमान हे सौदीचे कित्येक वर्षांपासून अघोषित राज्यकर्ते आहेत.
प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद हे परराष्ट्र मंत्री, मोहम्मद अल-जदान अर्थमंत्री आणि खालिद अल-फलिह गुंतवणूक मंत्री म्हणून कायम राहणार आहेत. सौदी अरेबियाने संरक्षण उद्योगात आत्मनिर्भरता 2% वरून 15% पर्यंत वाढवली आहे. नवे संरक्षण मंत्री ते 50% पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील, असे क्राऊन प्रिन्स यांनी म्हटले आहे.
86 वर्षीय राजे सलमान 2015 मध्ये शासक बनले, परंतु त्यापूर्वी त्यांनी प्रिन्स सलमानप्रमाणेच सुमारे अडीच वर्षे क्राऊन प्रिन्स म्हणून काम केले होते. गेल्या काही काळापासून किंग सलमान यांची प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे क्राऊन प्रिन्सच पंतप्रधान बनण्याची शक्यता वर्तविली जात होती. किंग सलमान यांना या वर्षी दोनदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मे महिन्यात ते जवळपास आठवडाभर हॉस्पिटलमध्ये होते. यावेळी कोलोनोस्कोपीसह अनेक तपासण्या करण्यात आल्या होत्या.
क्राऊन प्रिन्सने संरक्षण मंत्री म्हणून 2015 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी २०३० चे व्हिजन आखले होते. सौदीला अरब आणि इस्लामिक देशांची सर्वात मोठी शक्ती बनवणे हा त्याचा उद्देश आहे. याअंतर्गत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. एका पत्रकाराच्या हत्ये प्रकरणी देखील ते आरोपी आहेत.