कोरोनानंतर इटलीवर कावळ्यांचाही हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:05 AM2021-06-17T08:05:17+5:302021-06-17T08:05:41+5:30
कोरोनाच्या हल्ल्यानं हादरलेला इटली म्हटलं तर अजूनही त्यातून सावरलेला नाही. या हल्ल्यातून कसाबसा बचाव करीत असताना इटलीवर आता दुसरा हल्ला सुरू आहे.
परवाचीच गोष्ट.. इटलीची राजधानी रोममध्ये सध्या ना पाऊस आहे, ना ऊन. पण शेकडो, हजारो लोक रस्त्यावर छत्री घेऊन होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी डोक्यावर टोप्या घातलेल्या होत्या. काहींनी जॅकेट्स घालून ती डोक्यावर ओढून घेतली होती.. असं का विचित्र वागत होते इटलीचे नागरिक?.. एका हल्ल्यातून वाचण्यासाठी त्यांनी असं केलं होतं.
कोरोनाच्या हल्ल्यानं हादरलेला इटली म्हटलं तर अजूनही त्यातून सावरलेला नाही. या हल्ल्यातून कसाबसा बचाव करीत असताना इटलीवर आता दुसरा हल्ला सुरू आहे. हा हल्ला आहे कावळ्यांचा. कावळ्यांच्या विणीचा हा हंगाम. हजारो, लाखो कावळ्यांच्या वसाहतीत त्यांनी पिलांना जन्म दिला आहे. यातील कावळ्यांच्या अनेक वसाहती नागरी भागात आहेत. या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांवर हे कावळे सरळ हल्ला करतात. त्यांच्या डोक्यात चोची मारतात, त्यांचे कपडे फाडतात, लोकांना जखमी करतात.. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कावळे केव्हा हल्ला करतील या भीतीनं सारा जामानिमा करूनच ते बाहेर पडतात, नाहीतर सरळ त्या रस्त्याला जाणंच टाळतात! एखादा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्या परिसराला जसं स्वरूप येतं, तसंच स्वरूप या भागाला येतं आणि कर्फ्यू असल्यागत रस्ते निर्मनुष्य होतात.
रस्त्यावर झाडी असलेल्या कावळ्यांच्या वसाहतीजवळून परवाच एक तरुणी जात होती. ‘अजाणतेपणा’नं तिनं स्वत:चं कोणतंही संरक्षण केेलेलं नव्हतं आणि छत्री, काठी.. अशी ‘हत्यारं’ही सोबत नव्हती. दुकानातून ती बाहेर पडली आणि दोन कावळ्यांनी तिच्यावर जोरदार हल्ला चढवला. तिचे कपडे फाडले, तिच्या केसांच्या झिंज्या केल्या, डोक्यात चोची मारून तिला रक्तबंबाळ केलं.. हातात फ्रोजन पिझ्झाची शॉपिंग बॅग असलेल्या तरुणीनं या बॅगलाच शेवटी हत्यार बनवलं आणि कसाबसा स्वत:चा बचाव केला.
..पण कावळे तरी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर हा असा जीवघेणा हल्ला का करताहेत? - कारण त्या परिसरात असलेली त्यांची पिल्लं. त्या भागात वावरणारी माणसं हा आपला नंबर १ चा शत्रू आहे असं मानून हे कावळे लगेच लोकांवर हल्ले करतात.
अर्थातच इटलीसाठी कावळ्यांचे हे हल्ले नवीन नाहीत. दरवर्षी वसंत ऋतूत नागरिकांना कावळ्यांच्या या हल्ल्याला सामोरं जावं लागतं. यंदा मात्र या हल्ल्यांची तीव्रता जरा जास्तच आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे. पाओला ॲमाबिले या ६६ वर्षांच्या आजी म्हणतात, हे कावळे तुमच्यावर केव्हा हल्ला करतील याचा काहीच भरवसा नाही. त्यामुळे स्वत:चं संरक्षण तुम्हाला करता आलंच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सतत तयारीतही असलं पाहिजे. याच आठवड्यात मार्टिना मस्सारी या अकाउंटंटवर कावळ्यांनी हल्ला करून तिला प्रसाद दिला होता. ती सांगते, कावळ्यांनी हल्ला केलेल्या लोकांच्या किंचाळण्याचा आवाज आता आमच्या सवयीचा झाला आहे. रस्त्यावरून कोणाच्या किंचाळण्याचा आवाज ऑफिसमध्ये ऐकायला आला म्हणजे कावळ्यांनी आपलं नवं सावज हेरलं आहे, हे लगेच आम्हाला कळतं. दुर्दैव असं की त्यांना वाचवायलाही आम्हाला जाता येत नाही. कारण प्रत्येकाला स्वत:लाच आपला बचाव करावा लागतो.
एलिझाबेटो जियानुबोलो या वकील बाई सांगतात, कावळ्यांच्या भीतीनं माझ्या आईनं माझ्या घरीच येणं सोडून दिलं आहे. फलाविया तोमासिनी या १८ वर्षीय तरुणीनं कावळ्यांच्या धाकानं शाळेच्या मेन गेटमधून आत जाणंच बंद करून टाकलं आहे. कारण तिच्यावरही कावळ्यांनी अनेकदा हल्ला केला आहे. ती म्हणते, ‘तू रायफल घेऊनच शाळेत जात जा,’ असं माझी आई रोज मला सांगत असते!
कावळ्यांच्या वसाहती असलेल्या परिसरातील सगळी झाडं कापून टाकावीत, म्हणजे कावळ्यांना आश्रयाला जागा मिळणार नाही, अशी मागणी कित्येक रहिवाशांनी केली आहे. जखमी झालेल्या नागरिकांनी पक्षिप्रेमींना आणि त्यांच्या संघटनांनाही संतापानं फोन करणं सुरू केलं आहे. पक्षिप्रेम ठीक आहे, पण त्यासाठी किती नागरिकांना तुम्ही जखमी करणार आहात? पक्ष्यांवरचं प्रेम उतू जात असताना माणसांकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही, असा सात्त्विक संताप ते व्यक्त करतात. याबाबत पक्षीसंवर्धकांचं म्हणणं आहे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. इटलीमध्ये लोक करीत असलेला प्रचंड कचरा, त्यामुळे झालेली उंदरांची वाढ आणि ते खाण्यासाठी इतर देशांतील कावळ्यांच्या झुंडीही येथे येतात. कचरा कमी केला, तर कावळ्यांबाबत ओरडण्याची गरज पडणार नाही!!
‘संरक्षण’ नाही, हे तर ‘निमंत्रण’!
या काळात उत्तर युरोपातून स्थलांतरित होऊन येणाऱ्या सी गल्समुळेही रोमचे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या या भागात लाखाच्या घरात सी गल्स आहेत. पक्षिप्रेमी फ्रान्सिस्का मॅन्झिया म्हणतात, कावळा हा अतिशय धीट प्राणी आहे. आपल्या पिलांना वाचविण्यासाठी आपल्यापेक्षा मोठे पक्षी गरुड, ससाणे इतकंच काय हत्तीवरही तो हल्ला करू शकतो. लोक संरक्षणासाठी म्हणून काळी टोपी, काळी छत्री, काळ्या बॅगा घेऊन बाहेर पडतात, हे म्हणजे तर विनोद आहे. कारण त्यामुळे कावळे अधिक आक्रमक होतात!