डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका कॉलने उडाला कच्च्या तेलाच्या दरवाढीचा भडका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 12:22 PM2020-04-03T12:22:51+5:302020-04-03T12:24:06+5:30
ऑईल मार्केटवर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच दबाव पाहायला मिळत आहे. त्यावेळी तेल उत्पादन घटविण्यासंदर्भात रशिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सहमती झाली नव्हती. यासाठी सौदीने रशियाला दोषी ठरवले होते.
नवी दिल्ली - जागतीक पातळीवर कच्च्या तेलाच्या घटलेल्या मागणीमुळे किंमतीत मोठी घसरण झाली. मात्र गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक कॉल या दरवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरला असल्याचे समजते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ट्विट करून सौदी अरेबिया आणि रशियाने तेल उत्पादनात कपात करून ‘प्राईस वॉर’ समाप्त करण्याची आशा व्यक्त केली होती. त्यानंतर सौदीने देखील तेल निर्यातक देशांची संघटना ओपेक आणि सहयोगी तेल उत्पादक देशांची बैठक बोलवली. जेणेकरून तेल बाजाराला बॅलन्स करण्यासाठी निष्पक्ष करार व्हावा. या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली.
कच्च्या तेलाचे दर सुरुवातीला ४७ टक्क्यांनी वाढले. डोनाल्ड ट्रम्प आणि सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यात फोनवर चर्चा झाल्यानंतर सौदी अरेबियाने तेल उत्पादक देशांची बैठक बोलवली होती. ट्रम्प यांचा हा कॉल महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या एका फोन कॉलमुळे कच्च्या तेलाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये बेंट क्रुड २१ टक्क्यांनी आणि डब्ल्यूटीआयमध्ये २५ टक्क्यांनी दरवाढ नोंदविण्यात आली. मात्र आज तेलाच्या दरात ३ टक्क्यांपर्यंत कमी नोंदविण्यात आली.
ऑईल मार्केटवर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच दबाव पाहायला मिळत आहे. त्यावेळी तेल उत्पादन घटविण्यासंदर्भात रशिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सहमती झाली नव्हती. यासाठी सौदीने रशियाला दोषी ठरवले होते. अखेरीस रशिया आणि सौदी यांच्या एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात मागील १८ वर्षांच्या निच्चांकी स्तरावर गेले होते.