नेपाळमध्ये जातीय हिंसाचार, अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:20 PM2023-10-04T15:20:43+5:302023-10-04T15:21:31+5:30
या घटनेनंतर नेपाळला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील भागातही सतर्कतेची घोषणा करण्यात आली आहे.
काठमांडू : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये जातीय हिंसाचार उसळला आहे. येथील नेपाळगंज भागात जातीय हिंसाचार भडकल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नेपाळगंज परिसरात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
मुख्य जिल्हा अधिकारी बिपीन आचार्य यांनी सांगितले की, हिंसाचार आणि दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर हा कर्फ्यू सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आला आहे. कोणालाही एकत्र जमण्याची परवानगी नाही. कोणी कायद्याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे. या घटनेनंतर नेपाळला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील भागातही सतर्कतेची घोषणा करण्यात आली आहे.
हिमालयन टाइम्सच्या रिपोर्टनुसार नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांत जातीय हिंसाचारात लक्षणीय वाढ झाली आहे. आता हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला वारंवार कर्फ्यू लावावा लागत आहे. हिंदू आणि मुस्लिमांमधील वाढता तणाव पाहता सुरक्षा यंत्रणांचा ताण वाढला आहे. दरम्यान, धारन परिसरात एक व्हिडिओ समोर आल्याने तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये लोक गोमांस खाताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर दुसऱ्या गटाने संपूर्ण कोशी प्रांतातील लोकांना एकत्र केले आणि गायींच्या रक्षणासाठी रॅली काढली. या काळात प्रचंड हिंसाचार आणि दगडफेक झाली. हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. या हिंसाचारात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, अशाच प्रकारे येथील मलंगवा आणि सरलाही भागात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बराच वेळ संचारबंदी लागू करावी लागली होती. मलंगवा परिसरात गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये हिंसाचार उसळला होता.