युक्रेनमधील सरकारी वेबसाइटवर सायबर हल्ले; रशियाच्या काही लष्करी तुकड्या माघारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:52 AM2022-02-17T10:52:33+5:302022-02-17T10:53:20+5:30
युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.
मॉस्को : रशियाने युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेल्या सुमारे दीड लाख सैन्यापैकी काही लष्करी तुकड्या माघारी बोलाविल्या आहेत. सीमेवरील आमचा युद्धसराव संपल्याचे रशियाने जाहीर केले. मात्र, या घोषणेनंतर लगेचच युक्रेनचे लष्कर व अन्य सरकारी खात्यांच्या वेबसाइटवर सायबर हल्ले झाले आहेत. या कृत्यामागे रशियाचाच हात असल्याचा आरोप युक्रेनच्या नागरिकांनी केला.
युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने युरोप, अमेरिकेसह सारे जग चिंताक्रांत झाले आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ सोल्झ यांनी युक्रेनला जाऊन तेथील राज्यकर्त्यांशी चर्चा केली. ते रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याही संपर्कात आहेत. युक्रेनवर आक्रमण करण्यापासून रशियाला परावृत्त करण्याचा सोल्झ यांचा प्रयत्न आहे.
युक्रेनकरिता उड्डाणे वाढविण्याचे भारताचे प्रयत्न
युद्धाचे सावट असलेल्या युक्रेनमधील भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार विमानांची उड्डाणे वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे अधिकारी विविध विमान कंपन्यांशी सध्या चर्चा करत आहेत. युक्रेनमधील भारतीयांना मदत करण्यासाठी परराष्ट्र खात्याचे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.