वजन कमी करण्यासाठी सायकलने गाठा कार्यालय
By admin | Published: May 10, 2015 11:23 PM2015-05-10T23:23:54+5:302015-05-10T23:23:54+5:30
कार्यालयात खासगी गाडीऐवजी सार्वजनिक वाहतूक, सायकल वा पायी जाणे हे आरोग्यदायी आहे. वजन कमी करण्यासाठी याचा मोठा लाभ होऊ शकतो, असे नव्या संशोधनात दिसून आले आहे.
लंडन : कार्यालयात खासगी गाडीऐवजी सार्वजनिक वाहतूक, सायकल वा पायी जाणे हे आरोग्यदायी आहे. वजन कमी करण्यासाठी याचा मोठा लाभ होऊ शकतो, असे नव्या संशोधनात दिसून आले आहे.
कार्यालयात जाण्यासाठी स्वत:चे वाहन वापरण्याऐवजी सार्वजनिक वाहनाचा वापर करण्यानेही वजनावर काही प्रमाणात अंकुश राहू शकतो, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील ईस्ट एंग्लिया विद्यापीठ (यूईए) व सेंटर फॉर डायट अॅण्ड अॅक्टिव्हिटी रिसर्चच्या संशोधकांनी यासंदर्भात अभ्यास केला आहे. सायकल, पायी किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वाहनातून कार्यालयात जाण्याच्या सवयीमुळे दोन वर्षांत वजन कमी होऊ शकते, असे या संशोधनात आढळून आले आहे. सायकलने किंवा पायी कार्यालयात जाण्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होते, असे ब्रिटनमधील ईस्ट एंग्लिया विद्यापीठ (यूईए) व सेंटर फॉर डायट अॅण्ड अॅक्टिव्हिटी रिसर्चच्या संशोधकांना आढळून आले. संशोधकांनी २००४ ते २००७ यादरम्यान चार हजार लोकांचे सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढला. सर्वेक्षणातील सहभागी हे ब्रिटिश नागरिक आहेत. (वृत्तसंस्था)