डोनाल्ड ट्रम्प यांना 'मिडल फिंगर' दाखविणाऱ्या महिलेची गेली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 12:07 PM2017-11-07T12:07:21+5:302017-11-07T12:18:02+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. गोल्फ क्लबजवळील रस्त्यावर सायकलवरून ही तरूणी जात असताना डोनाल्ड ट्रम्प यांची गाडी तिच्या बाजूने गेली. तेव्हा तिने डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखविली. पण डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणं तिला महागात पडलं असून त्या महिलेला तिच्या नोकरीला मुकावं लागलं आहे.
जूली ब्रिस्कमॅन असं या मुलीचं नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवतानाचा या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 28 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. डोनाल्ड ट्रम्प गोल्फ क्लबमध्ये गेले होते. त्यावेळी गोल्फ क्लबजवळ असणाऱ्या रस्त्यावर ती महिला सायकल चालवल होती. त्यावेळी ट्रम्प यांच्या गाडीचा ताफा त्या तरूणीच्या बाजूने गेला. तो गाडीचा ताफापासून महिलेने मिडल फिंगर दाखविली. डोनाल्ड ट्रम्प यांची गाडी माझ्याबाजूने गेली आणि ते पाहून माझं रक्त खवळायला सुरूवात झाली. आणि तशी कृती घडल्याचं त्या 50 वर्षीय महिलेने सांगतिलं.
व्हाईट हाऊसच्या गाड्यांच्या ताफ्यात नेहमीच सामाविष्ट असणाऱ्या स्मियालोस्की यांनी सांगितलं की, ते त्यांचा कॅमेरा नेहमी सुरू ठेवतात. कधी काय दिसेल किंवा काय घडेल यांचा अंदाजा नसल्याने कॅमेरा नेहमी सुरू ठेवतात.
गाडीमध्ये कोण आहे याची कल्पना जूली ब्रिक्समॅन यांना असावी, म्हणूनच त्यांनी अशी कृती केल्याचं स्मियालोस्की यांनी म्हंटलं. ब्रिक्समॅन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगल दाखवितानाचा पाठमोरा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोतील महिला नेमकी कोण आहे याचा शोध घ्यायला सोशल मीडियाला फार वेळ लागला नाही.
जूली ब्रिस्कमॅन ज्या कंपनीत कार्यरत होत्या ती कंपनी युएस सरकार आणि मिलिटरीसाठी काम करते. हा फोटो व्हायरल झाल्यावर जूलीच्या वरिष्ठांनी त्यांना नोकरी सोडायला सांगितली.