Cyclone Mocha : मोचा चक्रीवादळाचा तडाखा! म्यानमारमध्ये परिस्थिती गंभीर; 81 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 09:47 AM2023-05-17T09:47:48+5:302023-05-17T09:59:44+5:30
Cyclone Mocha : चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळत आहे. मंगळवारपर्यंत म्यानमारमध्ये मोचा चक्रीवादळामुळे तब्बल 81 जणांचा मृत्यू झाला आहे.
मोचा चक्रीवादळामुळे म्यानमारमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळत आहे. मंगळवारपर्यंत म्यानमारमध्ये मोचा चक्रीवादळामुळे तब्बल 81 जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. मोचा चक्रीवादळ रविवारी बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले, त्यामुळे मुसळधार पाऊस आणि ताशी 195 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळे रखाइन प्रांताची राजधानी असलेल्या सितवेच्या काही भागातही पूर आला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, रोहिंग्या मुस्लिम अल्पसंख्याकांची वस्ती असलेल्या बू मा आणि जवळील खाँग डोके कार या रखाइन राज्यातील गावांमध्ये किमान 46 लोकांचा मृत्यू झाला. म्यानमारच्या राज्य प्रसारक एमआरटीव्हीच्या म्हणण्यानुसार, रखाइनची राजधानी सितवेच्या उत्तरेला असलेल्या राथेडाँग टाउनशिपमधील एका गावात मठ कोसळून तेरा लोकांचा मृत्यू झाला आणि शेजारच्या गावात इमारत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला.
सितवे जवळील बू मा गावाचे प्रमुख कार्लो यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या वाढू शकते. आता 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. 66 वर्षीय आ बुल हू सोन यांनी आपल्या मुलीसाठी प्रार्थना केली, जिचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, मोचा चक्रीवादळामुळे रविवारी वीज यंत्रणा ठप्प झाली आहे. आणि वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
सितवेजवळ विस्थापित रोहिंग्यांच्या दापिंग कॅम्पमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओहन ताव चाय गावात एक आणि ओहन तव गी गावात सहा जणांचा मृत्यू झाला. मोचा हे एका दशकाहून अधिक काळ या प्रदेशात धडकणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ होते, ज्याने अनेक गावं उद्ध्वस्त केलं, झाडे उन्मळून पडली आणि रखाइन राज्याच्या बहुतांश भागातील दळणवळण खंडीत केले. याशिवाय सरकारी माध्यमांनी तपशील न देता सोमवारी पाच मृत्यूची माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.