धावत्या रेल्वेत सिलिंडरचा स्फोट; ७४ ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 04:08 AM2019-11-01T04:08:45+5:302019-11-01T04:09:01+5:30
बर्निंग ट्रेन; पाकिस्तानात लाहोरहून कराचीला जाणाऱ्या एक्स्प्रेसमधील दुर्घटना
लाहोर : पाकिस्तानात लाहोर येथून कराचीला चाललेल्या तेजगाम एक्स्प्रेसमध्ये दोन गॅस सिलिंडरचा गुरुवारी पहाटे स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत ७४ प्रवासी मरण पावले. मृतांमध्ये बहुसंख्यजण मुल्ला-मौलवी असून ते एका धार्मिक कार्यक्रमासाठी चालले होते.
गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर या रेल्वेच्या तीन डब्यांना आग लागली. त्यामध्ये २०० प्रवासी होते. आगीमुळे घाबरलेल्या अनेक प्रवाशांनी जीव बचावण्यासाठी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. काही प्रवाशांनी न्याहारीसाठी रेल्वेगाडीमध्येच गॅस स्टोव्हवर खाद्यपदार्थ बनवायला सुरूवात केली. त्यावेळी सिलेंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. रेल्वेमधून प्रवाशांनी ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी आहे. मात्र तरीही काही जणांनी नियम धाब्यावर बसविल्याचा फटका अनेक प्रवाशांना बसला. तबलिघी जमातने मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
तपासणीत त्रुटी : प्रवाशांनी गाडीत गॅस सिलिंडर नेले, ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आली नाही. सामानाच्या तपासणीत त्रुटी राहिल्याची कबुली रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी दिली आहे.