अमेरिकेतील दैनंदिन व्यवहार लवकरच सुरू करणार : ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:24 AM2020-04-15T01:24:12+5:302020-04-15T01:24:21+5:30
अमेरिकेत सध्या एका महिन्यासाठी सामाजिक स्थलांतर नियमावली लागू आहे
वॉशिंग्टन : ‘कोव्हिड-१९’ या महामारीची लागण झालेले जगात सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेतील आहेत. जगातील सर्वांत बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला या रोगाचा मोठा फटका बसला आहे. यातून लवकर सावरण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशातील दैनंदिन व्यवहार सुरू करण्याच्या बाजूने आहेत. त्यावर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात टीका होत असली, तरी ‘आम्ही लवकरच देशातील दैनंदिन व्यवहार सुरू करणार आहोत,’ असे ट्रम्प यांनी सोमवारी जाहीर केले.
अमेरिकेत सध्या एका महिन्यासाठी सामाजिक स्थलांतर नियमावली लागू आहे. यासंदर्भात, व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना ट्रम्प म्हणाले, ‘‘सहकारी; तसेच जेष्ठ तज्ज्ञांसोबत या विषयावर मी अनेकदा चर्चा केली आहे. देशातील दैनंदिन व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू करण्याच्या योजनेवर आमचे काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल आणि पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरू होतील. आम्हाला अपेक्षित अवधीपूर्वी हे काम पूर्ण होऊ शकेल.’’
‘‘१ मेपासून अर्थव्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू होणे शक्य आहे का,’’ या प्रश्नावर ट्रम्प उत्तरले, ’’हा निर्णय कधी अमलात येईल, यावर मी आताच काही बोलणार नाही. याबद्दल येत्या काही दिवसांत तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल.’’ (वृत्तसंस्था)