दख्खन ज्वालामुखीने डायनोसॉर्सचा अंत

By Admin | Published: July 7, 2016 04:10 AM2016-07-07T04:10:53+5:302016-07-07T04:10:53+5:30

सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी बाह्य अवकाशातील एक विशाल अशनी अथवा लघुग्रह (अ‍ॅस्ट्रॉईड) येऊन आदळल्याने झालेला विनाश हेच पृथ्वीवर त्यावेळी असलेली डायनोसॉरसह बव्हंशी सजीवसृष्टी

Dakhkhana volcano ends dinosaurs | दख्खन ज्वालामुखीने डायनोसॉर्सचा अंत

दख्खन ज्वालामुखीने डायनोसॉर्सचा अंत

googlenewsNext

पॅरिस: सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी बाह्य अवकाशातील एक विशाल अशनी अथवा लघुग्रह (अ‍ॅस्ट्रॉईड) येऊन आदळल्याने झालेला विनाश हेच पृथ्वीवर त्यावेळी असलेली डायनोसॉरसह बव्हंशी सजीवसृष्टी नष्ट होण्याचे एकमेव कारण नव्हते. भूगर्भशास्त्रात ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आज भारतात असलेल्या भूप्रदेशात झालेला ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक हेही त्याचे एक तेवढेच महत्वाचे कारण होते, असा दावा अमेरिकेतील वैज्ञानिकांनी नव्या संशोधनाच्या आधारे केला आहे.
आजच्या मेक्सिकोमध्ये असलेल्या चिक्सुलब नावाच्या ठिकाणी झालेल्या अशनीच्या आघाताने डायनोसोर युगाचा अंत झाला, असे मानले जात होते. मात्र हे वैज्ञानिक म्हणतात की, अशनीचा आघात व ‘डेक्कन ट्रॅप्स’मध्ये झालेला ज्वालामुखीचा उद्रेक या कालमापनाच्या दृष्टीने काही शे वर्षांच्या अंतराने घडलेल्या दोन घटनांचा एकत्रित परिणाम डायनोसोरचे कर्दनकाळ ठरले. या दोन्ही घटनांमुळे वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर धूर, वाफ व धूळ पसरली की प्रदीर्घ काळ पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचणेही मुश्किल झाले.
परिणामी या दोन्ही घटनांच्या अलीकडे-पलीकडे सुमारे एक हजार वर्षांचा तीव्र जागतिक हवामान बदलाचा कालखंड निर्माण झाला व त्याच्याशी जुळवून घेणे न जमल्याने डायनोसॉर विनष्ट झाले. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील तीन वैज्ञानिकांच्या चमुने हे नवे संशोघन केले असून त्यांचा त्यावरील शोधनिबंध ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. (वृत्तसंस्था)

काय व कसे केले संशोधन?
आज सदैव बर्फाच्छादित असलेल्या अंटार्क्टिक खंडावर लाखो वर्षांपूर्वी जलवनस्पतींची जंगले होती. या द्विपकल्पाच्या उत्तरेकडील टोकावरील त्रिभूज प्रदेशाशेजारी असलेल्या उथल पाण्याच्या किनारी भागात जिवाश्म रूपात सापडलेल्या २९ शिंपल्यांचा अभ्यास करून या वैज्ञानिकांनी ३५ लाख वर्षांच्या कालखंडतील तापमानाचा आलेख तयार केला. जिवाश्म रूपाने सापडलेले हे शिंपले ज्या काळात डायनोसॉरस विनष्ट झाले, साधारणपणे त्याच काळातील आहेत.

तापमानाच्या या आलेखावरून वैज्ञानिकांना असे आढळले की, हजारो वर्षे सुरू राहिलेला ‘डेक्कन ट्रॅप्स’मधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर पृथ्वीवरील सागरांचे तापमान ७.८ अंश सेल्सियसने वाढले. त्यानंतर सुमारे दीड लाख वर्षांनी अशनीचा आघात झाला, तेव्हा पुन्हा एकदा सागरी तापमानात १.१ अंश सेल्सियसची वाढ झाली. या दोन्ही घटनांमुळे पृथ्वीच्या वातावरणात वाढ करणारे आज जे ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ म्हणून ओळखले जातात, त्या वायूंसह प्रचंड प्रमाणावर धूर, वाफ व धूळ वातावरणात पसरली. यामुळे ‘हवामान बदला’चा कालखंड सुरू झाला.

काय आहे ‘डेक्कन ट्रॅप्स’? : ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश भारतीय उपखंडाच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात सुमारे दोन लाख चौ. किमी भागावर पसरलेला आहे. सह्याद्रीच्या रांगामधील महाबळेश्वर आणि त्या परिसरात दिसणारे संपूर्ण अखंड पाषाणाचे डोंगरही त्यातच मोडतात. ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकाने सुमारे १२,२७५ घनमैल एवढा लाव्हा भूगर्भातून बाहेर येऊन त्याचा ६,५०० फूटांचा थर जमिनीवर पसरला गेला. हा लाव्हा थंड झाल्यावर जो भूप्रदेश तयार झाला तो ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखला जातो.

Web Title: Dakhkhana volcano ends dinosaurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.