दलाई लामांचा भारतातील वारसदार चीनला अमान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:27 AM2019-03-20T06:27:08+5:302019-03-20T06:27:23+5:30
तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी माझा वारसदार भारतातून असू शकेल आणि चीनने दिलेला वारसदार मान्य होणार नाही, असे म्हटले आहे.
बीजिंग - तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी माझा वारसदार भारतातून असू शकेल आणि चीनने दिलेला वारसदार मान्य होणार नाही, असे म्हटले आहे. चीनने लामा यांचे हे म्हणणे मंगळवारी फेटाळले असून, तिबेटमधील बुद्धिझमचा पुढील धार्मिक नेता कम्युनिस्ट सरकार मान्य करील, असे स्पष्ट केले.
सोमवारी दलाई लामा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, माझा मृत्यू झाला की माझा अवतार भारतात आढळण्याची शक्यता आहे. चीनकडून इतर कोणताही वारसदार नेमण्याचा प्रयत्न झाल्यास तो मान्य होणार नाही, असा इशारा दिला होता. तिबेटच्या बुद्धिझममध्ये पुनर्जन्म हा विलक्षण मार्ग आहे. त्याने विधी आणि व्यवस्था निश्चित केल्या आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुअँग यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
दलाई लामा १९५९ मध्ये तिबेटमधून भारतात पळून आले होते. धार्मिक श्रद्धांच्या स्वातंत्र्याचे चीन सरकारचे धोरण आहे. तिबेटी बुद्धिझमच्या धार्मिक कामकाजाबद्दल आमचे नियम असून, पुनर्जन्म व्यवस्थेवर कायदा आहे. आम्ही तिबेटी बुद्धिझमच्या अशा मार्गांचा सन्मान करून संरक्षण करतो, असे गेंग म्हणाले.