डेंजर ड्रॅगनकडे एकाचवेळी 10 अण्वस्त्रे डागणारे क्षेपणास्त्र
By Admin | Published: February 2, 2017 04:04 PM2017-02-02T16:04:29+5:302017-02-02T16:14:45+5:30
अमेरिकेत झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर चीनने केलेली ही चाचणी महत्वाची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात चीन आणि अमेरिकेमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 2 - घातक शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या चीनने एका क्षेपणास्त्रातून 10 अणवस्त्रांचा मारा करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर चीनने केलेली ही चाचणी महत्वाची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात चीन आणि अमेरिकेमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
मागच्या महिन्यात चीनने एकाचवेळी दहा वेगवेगळया ठिकाणी लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या DF-5C क्षेपणास्त्राची चाचणी केली. अमेरिकन प्रसारमाध्यमांनीच हे वृत्त दिले आहे. शांक्सी प्रांतातील ताईयुआन अवकाश तळावरुन DF-5C क्षेपणास्त्र डागण्यात आले.
प्रत्यक्ष चाचणीच्यावेळी अणवस्त्राऐवजी कमी क्षमतेच्या शस्त्रांचा वापर केला. DF-5C आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्र प्रणाली असून 1980 पासून चीनी लष्कर या क्षेपणास्त्राचा वापर करत आहे. काळानुरुप या क्षेपणास्त्रप्रणालीमध्ये बदल करुन अधिक अत्याधुनिक बनवण्यात आली आहे.