हवामान बदलामुळे जीवजंतू धोक्यात
By admin | Published: May 4, 2015 11:16 PM2015-05-04T23:16:15+5:302015-05-04T23:16:15+5:30
हवामान बदलामुळे पृथ्वीवरील वातावरण बदलते आहे, त्याचा धोका मानवाला जितका आहे, त्याच्या कितीतरी पटीने तो पृथ्वीवर राहणाऱ्या जीवजंतूंना आहे.
वॉशिंग्टन : हवामान बदलामुळे पृथ्वीवरील वातावरण बदलते आहे, त्याचा धोका मानवाला जितका आहे, त्याच्या कितीतरी पटीने तो पृथ्वीवर राहणाऱ्या जीवजंतूंना आहे. जर्नल सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनानुसार या बदलामुळे पृथ्वीवर जगणाऱ्या सजीवांमधील दर सहापैकी एक प्रजात नष्ट होण्याचा धोका आहे.
हवामान बदलाचा सध्याचाच प्रवाह कायम राहिल्यास पृथ्वीचे तापमान ४.३ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. औद्योगिकीकरणामुळे वाढलेल्या या तापमानात सध्याचे किती प्राणी, पक्षी व वनस्पती तग धरू शकतील याचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा वातावरणात पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतीच्या १६ टक्के प्रजाती नष्ट होतील, असा निष्कर्ष नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे.
अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठातील पर्यावरणवादी व क्रांतिकारी जीवशास्त्रज्ञ मार्क अर्बन यांचे हे नवे संशोधन असून, त्यांच्याच आधीच्या १३१ संशोधनावर आधारित हा निष्कर्ष आहे. (वृत्तसंस्था)