धोका! पुतीन यांच्या विरोधी पक्षनेत्याला चहातून विष पाजले; व्हेंटिलेटरवर देतोय मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:51 PM2020-08-20T15:51:56+5:302020-08-20T16:04:49+5:30
गरम पाण्यामुळे विष सहज चहाच्या आत विरघळले. विमानाच्या आत नवलनी उलट्या करु लागले.
मॉस्को – रशियाचे विरोधी पक्षनेते एलेक्सी नवलनी यांना विमान प्रवासादरम्यान चहामध्ये विष मिसळून देण्यात आले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवलनी सध्या कोमामध्ये असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. नवलनीच्या प्रवक्त्या किरा यारम्यश यांनी ही माहिती दिली आहे.
किरा यांनी सांगितले की, नवलनी गुरुवारी एका कामानिमित्त सायबेरियाला गेले होते. तिथून ते पुन्हा मॉस्कोला परतत होते. प्रवासादरम्यान नवलनी आजारी पडल्यामुळे विमानाची आपत्कालीन लँडिंग करावी लागली. रशियाच्या अधिकृत वृत्तसंस्थांनी नवलनींची प्रकृती गंभीर आहे असं म्हटलं आहे. किरा यांनी ट्विटरवर लिहिले की, नवलनीला अत्यंत प्राणघातक विष देण्यात आले आहे. आता ते आयसीयूमध्ये दाखल आहेत, नवलनी यांना चहामध्ये विष देऊन पाजण्यात आले. ते सकाळी फक्त चहा पितात असं किरा म्हणाल्या.
किरा यांनी डॉक्टरांच्या हवाल्याने सांगितले की गरम पाण्यामुळे विष सहज चहाच्या आत विरघळले. विमानाच्या आत नवलनी उलट्या करु लागले. त्यांनी मला सांगितले ते बोलत राहा, कारण माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करू शकेन. त्यानंतर ते बाथरूममध्ये जाऊन बेशुद्ध पडले. नवलनी अजूनही बेशुद्ध असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. सध्या पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. लवकरच पोलीस या घटनेचा तपास करतील.
Russian opposition politician Alexei Navalny is in a coma in a Siberian hospital after drinking a cup of tea that his spokeswoman said she believed was laced with poison: Reuters
— ANI (@ANI) August 20, 2020
दरम्यान, कदाचित नवलनींना विष देण्याची घटना यावर्षी होणाऱ्या स्थानिक निवडणुकीशी संबंधित असावी. नवलनी पुतीन यांचे विरोधक आहे. व्यवसायाने वकील असणाऱ्या नवलनी यांनी भ्रष्टाचाराविरोधात अनेकदा अभियान चालवले होते. त्यांनी नेहमी पुतीन विरोधी रॅली आयोजित केल्या होत्या. यामुळे त्यांना बरीच वर्षे तुरूंगात रहावे लागले होते असं किरा यांनी सांगितले.