भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईत दंगल केक, किंमत वाचून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 08:22 PM2017-08-15T20:22:40+5:302017-08-15T20:29:15+5:30
4 फूट लांब असलेला हा केक तब्बल 54 किलो वजनाचा असून या केकची थीम बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या दंगल चित्रपटावर आधारित आहे.
दुबई, दि. 15 - भारताच्या 71 स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईतल्या ब्रॉडवे बेकरीने खास केक तयार केला आहे. 4 फूट लांब असलेला हा केक तब्बल 54 किलो वजनाचा असून या केकची थीम बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या दंगल चित्रपटावर आधारित आहे. या केकची किंमत तब्बल 40 हजार डॉलर्स म्हणजेच 25 लाख रुपयांच्या आसपास आहे.
या केकमध्ये महावीर फोगट यांची भूमिका साकारलेला आमीर खान तसंच गीता आणि बबिता फोगट दाखवण्यात आल्या आहेत. गीता फोगटनं 2010 सालच्या कॉमनवेल्थ खेळात मिळवलेल्या गोल्ड मेडलचीही प्रतिकृती या केकमध्ये लावण्यात आली आहे. या मेडलसाठी 75 ग्रॅम सोन्याचं खाद्यदेल वापरण्यात आलंय. हा केक बनवण्यासाठी बेकरीला साडेतीन आठवडे लागले आहेत. हा केक जगातील सर्वात महाग केक असल्याचा दावा ब्रॉडवे बेकरीने केला आहे.
ब्रॉडवे बेकरीच्या एका खास ग्राहकाच्या इच्छेखातर हा केक बनवण्यात आहे. केक बनवण्यासाठी शुगर फाँडन्ट, चॉकलेट स्पंज, चॉकलेट गनाश, बेल्जियम डार्क चॉकलेट आणि 75 ग्रॅम एडिबल गोल्ड पावडर वापरण्यात आले असून केक बनवायला तीन आठवड्यांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली आहे. हा केक तब्बल 250 लोक खाऊ शकतील.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करुन सलग चौथ्यांदा देशवासियांना संबोधित केले. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.
म्हणून या गावाने नाही साजरा केला स्वातंत्र्य दिन
देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरी जिल्ह्यातील चौधीपूर गावातील लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे राहणारा बहुतांश समाज हा आदिवासी आहे.
स्वातंत्र्य होवून 70 वर्ष झाली पण आमच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. आम्ही अजूनही त्याच गरिबीत जगत आहोत. अशा स्वातंत्र्याचा काय फायदा?आम्हाला जर मुलभूत सुविधाच मिळत नाहीत तर आम्ही स्वातंत्र्य दिन का साजरा करावा. आमच्याकडे मुलभूत सुविधा नसल्यामुळे आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करणार नाही असं गावातील एक रहिवासी गुलाब सिंह म्हणाले.