व्हीलचेअर रेसमध्ये डेव्हिड वीरनं रचला इतिहास
By admin | Published: May 30, 2016 09:32 PM2016-05-30T21:32:33+5:302016-05-30T21:32:33+5:30
लंडनमध्ये झालेल्या वेस्टमिन्स्टर माइल या व्हीलचेअर रेसमध्ये 3 मिनिटांत मैलाचं अंतर पार करून डेव्हिड वीरनं नवा इतिहास रचला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 30 - इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणूस कोणतंही कठीण आणि असाध्य आव्हान अगदी सहजगत्या पार करू शकतो याचा प्रत्यय एक व्हीलचेअर रेसरनं दिला आहे. लंडनमध्ये झालेल्या वेस्टमिन्स्टर माइल या व्हीलचेअर रेसमध्ये 3 मिनिटांत मैलाचं अंतर पार करून डेव्हिड वीरनं नवा इतिहास रचला आहे. त्यानं 2 मिनिट 57 सेकंदांत वेस्टमिन्स्टर माइल ही रेस जिंकली आहे. लंडन मॅरेथॉनमध्ये डेव्हिड वीरनं सहा वेळा जेतेपद मिळवलं आहे.
"मी नेहमी म्हणायचो, मी हे करू शकतो", अशा भावनाही डेव्हिडनं व्यक्त केल्या आहे. डेव्हिड वीरनं लंडन 2012मध्ये झालेल्या स्पर्धेत साऊथ आफ्रिकेचा प्रतिस्पर्धी अर्न्स्ट व्हॅन ड्याक याच्यावर मात करत 4 गोल्ड मेडलही पटकावले होते. "अर्न्स्टचा पराभव करणं हे माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं. मला गेल्या वर्षीपासूनच माहीत होतं की माझी सुरुवात ही निराशाजनक आहे. मात्र मला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि मी आता जगातला सर्वोत्तम व्हीलचेअर रेसर झालो आहे", अशी प्रतिक्रिया डेव्हिड वीरनं व्यक्त केली. गेल्या महिन्यात झालेल्या लंडन मॅरेथॉनमध्ये डेव्हिड वीरनं तिसरा क्रमांक पटकावला होता. याआधी सर रॉजर बॅनिस्टर यांनी 1954मध्ये 4 मिनिटांत मैलाचं अंतर पार केलं होतं. त्यांनीही डेव्हिडला या नव्या विक्रमाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.