'अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू
By मोरेश्वर येरम | Published: December 25, 2020 01:04 PM2020-12-25T13:04:01+5:302020-12-25T13:04:29+5:30
दाऊदचा पुतण्या सिराज कासकर याला कोरोनाची लागण झाली होती. तो केवळ ३८ वर्षांचा होता. 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रानं सिराज कासकरच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
मुंबई
कुख्यात गुंड आणि मुंबई हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिम याच्या पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या कराचीमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
दाऊदचा पुतण्या सिराज कासकर याला कोरोनाची लागण झाली होती. तो केवळ ३८ वर्षांचा होता. 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रानं सिराज कासकरच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
सिराज कासकर हा दाऊदचा मोठा भाऊ साबिर कासकर याचा मुलगा होता. सिराज कासरकर विवाहीत असून दाऊदसोबतच कराची येथे क्लिफ्टन परिसरात कडेकोट सुरक्षेत एका बंगल्यात तो राहत होता. सिराजवर अब्दुला शाह गाझी दर्गा येथे दफनविधी पार पडला आहे. सिराजचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई आणि दुबईतील जवळच्या नातेवाईकांनाही देण्यात आली आहे.
सिराज कासकर याचे वडील साबिर कासकरला १९८० साली पठाण गँगसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड मन्या सुर्वेच्या मदतीने गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. मुंबईच्या अंडलवर्ल्ड इतिहासात दाऊद आणि पठाण गँगमधील गँगवॉरमध्ये साबिर कासकरची हत्या हे गाजलेले प्रकरण होते.